वांद्र्यातला एक फोन खणाणतो आणि सारं काही बदलून टाकतो!

मुंबईतील वांद्र्यातला एक फोन. याच फोनवरुन नरेंद्र मोदींना पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केलं जातं. आणि त्या मोदींचा दिल्लीत पराभव करणा-या केजरीवालांनाही याच फोनवरुन शुभेच्छा दिल्या जातात.... या फोनमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे... सगळं काही बदलून टाकण्याची.

Updated: Mar 11, 2015, 10:45 PM IST
वांद्र्यातला एक फोन खणाणतो आणि सारं काही बदलून टाकतो! title=

मुंबई : मुंबईतील वांद्र्यातला एक फोन. याच फोनवरुन नरेंद्र मोदींना पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केलं जातं. आणि त्या मोदींचा दिल्लीत पराभव करणा-या केजरीवालांनाही याच फोनवरुन शुभेच्छा दिल्या जातात.... या फोनमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे... सगळं काही बदलून टाकण्याची.

एक फोन खणाणतो आणि सारं काही बदलून टाकतो.एक फोन करतो काम तमाम....एक फोन जो बदलून टाकेल सगळं राजकीय वातावरण. आम्ही बोलतोय मातोश्रीवरच्या लँडलाईन फोनबद्दल.लँडलाईनपेक्षा आपण त्याला हॉटलाईनच म्हणू. कारण सगळ्या गरमागरम चर्चा याच फोनवर होतात. महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळा माहोल बदलून टाकण्याचं प्रचंड सामर्थ्य या फोनमध्ये आहे.

मंगळवारीही असाच एक फोन मातोश्रीवर खणखणला. आणि भूमीअधिग्रहणावरुन तापलेलं वातावरण बर्फासारखं वितळलं. तो फोन होता व्यंकय्या नायडूंचा. भूमिअधिग्रहण विधेयकावरुन शिवसेनेनं गल्लीपासून दिल्लीपर्यंत रान पेटवलं होतं. हा कायदा शेतक-यांच्या विरोधात कसा आहे, याची उद्दव ठाकरेंसह शिवसेना नेते तावातावानं वक्तव्य करत होते. पण नायडूंचा फोन आला आणि जादूची कांडी फिरली.

शिवसेनेचा विरोध एका क्षणात गळून पडला आणि शिवसेना खासदार तटस्थ राहिले. भूमिअधिग्रहण विधेयक लोकसभेत मंजूर झालं. ही किमया करुन दाखवली मातोश्रीच्या या हॉटलाईननं. या हॉटलाईननं याआधीही चुटकीसरशी कामं केली आहेत. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शाह यांची निवड झाल्यावर, ते मातोश्रीवर जाणार की नाही, यावरुन गरमागरम चर्चा रंगत होत्या. त्यावेळी उद्धव यांनी मातोश्रीवरुन अमित शाहांना फोन करत  आमंत्रण दिलं आणि अखेर अमित शाह मातोश्रीची पायरी चढले.

उद्धव यांच्या या आऊटगोईंग कॉलची परतफेड झाली ती देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीवेळी. यावेळी मातोश्रीवर अमित शाहांचा फोन आला. आणि शपथविधीला उपस्थित राहणार नाही म्हणणारे उद्धव ठाकरे क्षणार्धात वानखेडे स्टेडियमवर अवतरले. विधानसभा निवडणुकीच्या काळात मातोश्रीवरच्या या फोनवरुनच उद्दव ठाकरेंनी आजारी राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली आणि महाराष्ट्राला चघळायला एक नवीन विषय उपलब्ध करुन दिला. 

याच हॉटलाईनसंदर्भात गडकरींनीही खळबळजनक विधान केलं होतं. माझे मातोश्रीवरचे फोन  वरपर्यंत पोहोचतच नाहीत, अशी तक्रार खुद्द बाळासाहेबांकडे केल्यावर केल्यावर चांगलीच खडाखडी झाली होती. मातोश्रीवर आलेले फोन टेलिफोन ऑपरेटर रिसीव्ह करतात. पण कुठला फोन कुणाला द्यायचा, आणि कुणाची लाईन कापायची, याच्या नाड्या मिलिंद नार्वेकरांच्याच हातात असल्याची दबक्या आवाजात चर्चा होते.

खरं तर उद्धव यांच्याकडे अत्याधुनिक मोबाईल फोन आहे. शिवसेनेचं अख्खं राज्यशकट कसं चाललंय, त्याची खडानखडा माहिती त्यांना एका टचवर उपलब्ध आहे. पण हा मोबाईल अत्यंत मोजक्या लोकांसाठी उपलब्ध आहे.... उद्धव यांना गाठायचं असेल तर मातोश्रीच्या लँडलाईनचा नंबरच डायल करावा लागतो. मातोश्रीच्या या हॉटलाईनची महती ज्याला कळली, आणि ज्याला त्या फोनवर उद्धव भेटले तो तरला. नाही तर आपण ज्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहात, ती व्यक्ती संपर्कक्षेत्राच्या बाहेर असेल, तर मात्र काही खरं नाही.     

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.