विखेंकडून मानसिक छळ, काँग्रेसमध्ये कोंडमारा : बाळासाहेब थोरात

 विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हल्लाबोल चढवला आहे.  

Updated: Nov 29, 2016, 03:57 PM IST
विखेंकडून मानसिक छळ, काँग्रेसमध्ये कोंडमारा : बाळासाहेब थोरात title=

मुंबई : नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसला जोरदार फटका बसल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार जुंपली आहे. पराभवाचे खापर राज्यातील नेतृत्वावर फोडण्यात आले आहे. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हल्लाबोल चढवला आहे. त्याचवेळी ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या टीकेचे समर्थन केले.

बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे संघर्ष शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळाले. विखेंकडून मानसिक छळ, पक्षात कोंडमारा होत असल्याचा थोरात यांनी आरोप केला आहे. झी 24 तासवरील विशेष मुलाखतीत प्रदेश नेतृत्वावरही प्रथमच थोरात यांनी हल्लाबोल केला.

दरम्यान, सिंधुदुर्गात विजय मिळवत नारायण राणे यांनी कमबॅक केले. सत्ता परिवर्तनासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवणे ही काळाची गरज असल्याचं मत राणे यांनी व्यक्त केले. त्याचवेळी काँग्रेस नेतृत्वावरही त्यांनी 'प्रहार' केला. माझे कमबॅक नाही, मी आहे तिथेच आहे, असे राणे म्हणालेत.

बाळासाहेब थोरात यांनी झी 24 तासवर कोंडलेला श्वास मोकळा करत विखे पाटलांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सत्ताधा-यांकडून लाभ उठवत पक्षातल्या नेत्यांना छळत असल्याचा आरोप त्यांनी विखे पाटलांवर केला. विधान सभेत विखे पाटील यांचे वागणे संशायस्पद असल्याचे थोरात यांनी म्हटले. तर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असती तर वेगळे चित्र असते असे म्हणत राणेंनी प्रदेश नेतृत्वावर टीका केली. या टीकेचे समर्थन थोरात यांनी केले. त्याचवेळी नेतृत्वार टीकेचे वार केले आहेत.