मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बाळासाहेब हिट लिस्टवर होते, यावर अनोखी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, 'लष्करे तैयबा' या दहशतवादी संघटनेच्या 'हिट लिस्ट‘वर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, हे ऐकून आम्हाला अभिमान वाटतो.'
पाकिस्तानी वंशाचा अमेरिकेतील दहशतवादी डेव्हिड हेडली याने, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेने जीवे मारण्याचा कट रचल्याचे आणि तसा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.
'शिवसेनाप्रमुखांना मारण्यासाठी लष्करे तैयबाने प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले होते. मात्र तो पळून गेला. मला विचारावेसे वाटते की पोलिसांनी ही वस्तुस्थिती का लपवून ठेवली. तो व्यक्ती कोण होता, जो तुरुंगातून पळून गेला आणि तो कसा पळून गेला? त्यामागे कोणता कट होता?, असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई पोलीस आणि सरकारनेही या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत. पाकिस्तान आणि दहशतवाद्यांच्या कारवायांचा विरोध करणारे बाळासाहेब खरे राष्ट्रवादी होते. त्यामुळेच लष्करे तैयबाच्या हिट लिस्टवर ते असल्याचे समजल्याने आम्हाला आश्चर्य नव्हे तर अभिमान वाटत आहे', असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.