www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रात्री-अपरात्री तुमच्यावर एटीएममधून पैसे काढण्याची वेळ आली, तर तुमची पंचाईत होऊ शकते. `एनी टाईम मनी` आणि `२४ तास केव्हाही पैसे काढा`, असं म्हणत उभी राहिलेली ही एटीएम सेंटर्स आता रात्री बंद राहण्याची शक्यता आहे.
मुंबईत रात्री-मध्यरात्री तुमच्यावर एटीएममधून पैसे काढण्याची वेळ आली, तर पैसे मिळतील की नाही? याबाबत शाश्वती नाही. कारण १ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात ज्या एटीएम सेंटर्सवर सिक्युरिटी गार्ड नसेल, ते एटीएम संध्याकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. सगळ्या बँकांनी एटीएम सेंटरना २४ तास सुरक्षा पुरवावी, असे आदेश महाराष्ट्र सरकारनं दीड महिना आधीच दिले होते. पण बऱ्याचशा बँकांनी योग्य उपाययोजना केलेल्या नाहीत. महाराष्ट्रात जवळपास पंधरा हजार एटीएम सेंटर्स आहेत. त्यापैकी वीस टक्के एटीएम सेंटर्समध्ये पुरेशी सुरक्षा नसल्यानं ती रात्री बंद राहण्याची शक्यता आहे. या वृत्ताला बँक ऑफ इंडियाचे सीएमडी व्ही. के. अय्यर यांनीही दुजोरा दिलाय.
काही महिन्यांपूर्वी बँगळुरूमधल्या एटीएम सेंटरमध्ये महिलेवर हल्ला झाल्याचा भयानक प्रकार घडला होता. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं सगळ्या बँकांना सुरक्षा वाढवायला सांगितलं होतं. राज्य सरकारनं रिझर्व बैंक, बँकांच्या संघटना, आयबीए आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुरक्षा कडक करण्याचे आदेश दिले होते. एटीएम सेंटर्सवर शस्त्रास्त्रांसह सिक्युरिटी गार्ड चोवीस तास तैनात करावा, प्रत्येक एटीएम सेंटरमध्ये आणि बाहेर सीसीटीव्ही लावण्यात यावेत. त्या सीसीटीव्हीचं फुटेज किमान ९० दिवस डिलीट करु नये, एटीएम सेंटरच्या दरवाजांवरची पोस्टर्स हटवावी, एटीएम सेंटरच्या आत पुरेसा प्रकाश आणि इमर्जंसी अलार्म असावा, यासह बँकांचे एटीएम सेंटर्स एकाकी ठिकाणी असू नयेत, अशा सूचना सरकारनं दिल्यायत. परंतु, आयबीएचे चेअरमन के. आर. कामथ यांच्या म्हणण्यानुसार हे सगळे उपाय होण्यासाठी बराच वेळ लागेल.
बँकांच्या एटीएम सेंटरच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असल्याचं आरबीआयनं आधीच स्पष्ट केलं होतं. आता, लवकरात लवकर बँकांनी सुरक्षेचे सगळे निकष पूर्ण केले नाहीत, तर एटीएम सेंटर्स रात्री बंद राहणार आहेत आणि स्वाभाविकच ग्राहकांचं आणि बँकांचंही नुकसान होणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.