मुंबई : दिल्लीतील प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणी आरोपी अंकुर पनवारला दोषी ठरवण्यात आले आहे. आरोपी अंकुर पनवार याच्यावर हत्येचा गुन्हा निश्चित करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे, अशी माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.
दिल्लीहून नौदलाच्या हॉस्पिटलमधील नोकरीवर रुजू होण्यासाठी मुंबईत आलेल्या प्रीती हिच्यार 2 मे रोजी अॅसिड हल्ला करण्यात आला होता. कुलाबा येथील मेडिकल कॉलेजमधील लेफ्टनंट पदासाठी देशभरातून १५ मुलींची निवड झाली होती; त्यात प्रीतीचाही समावेश होता.
2 मे 2013मध्ये मुंबईतील वांद्रे स्थानकावर प्रीती राठीवर अंकुर पनवारने अॅसिड हल्ला केला होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. उद्या न्यायालयात शिक्षेवर युक्तिवाद होणार असून त्यानंतर न्यायालय आपला निर्णय देणार आहे.
अॅसिड हल्ल्यात प्रीतीच्या एका डोळ्याला दुखापत झाली होती, तर अॅसिडचे काही थेंब तोंडातही गेल्याने अन्ननलिकेला मोठ्या प्रमाणावर इजा पोहोचली होती. तिच्यावर भायखळ्याच्या मसीना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, पुढील उपचारांसाठी आवश्यक असलेल्या कार्डिओ थोरॅसिक सर्जरीची सुविधा या हॉस्पिटलमध्ये नसल्याने तिला १८ मे रोजी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं होते. त्यानंतर ती व्हेन्टिलेटरवरच होती. उपचारानंतर प्रीतीचा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये 1 जून रोजी मृत्यू झाला होता.