‘बेस्ट’न्यूज : सहप्रवाशांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई

मुंबईकरांनो, आता तुम्हाची बेस्ट बसमधून प्रवास करताना सहप्रवाशाचा मोबाईलवर जोरजोरानं बोलणं आणि मोठ्यानं गाणी ऐकणं अशा प्रकारांमधून सुटका होणार आहे. कारण अशा पद्धतीनं इतरांना त्रास देणाऱ्या ‘तापदायक’ प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनानं घेतलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 6, 2013, 12:40 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईकरांनो, आता तुम्हाची बेस्ट बसमधून प्रवास करताना सहप्रवाशाचा मोबाईलवर जोरजोरानं बोलणं आणि मोठ्यानं गाणी ऐकणं अशा प्रकारांमधून सुटका होणार आहे. कारण अशा पद्धतीनं इतरांना त्रास देणाऱ्या ‘तापदायक’ प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनानं घेतलाय.

मोबाईलवर मोठमोठ्यानं संभाषण करीत बसगाड्यांमध्ये सहप्रवाशांच्या नाकात दम आणणार्यां ना आता बेस्ट अद्दल घडवणार आहे. अशा पद्धतीनं वर्तन करणाऱ्या प्रवाशांना थेट बसमधून खाली उतरवण्यात येणार आहे. तसा इशाराच बेस्ट प्रशासनानं दिलाय. बसमध्ये ट्रान्झिस्टर लावून मोठ्यानं गाणी ऐकण्यास मनाई आहे. मात्र, मोबाईलचा वापर वाढल्यापासून अनेकजण बसगाड्यांमध्ये मोठय़ा आवाजात गाणी ऐकणं, मोठ्यानं संभाषण करणं, त्यातही मोबाईलवर जोरजोरात ओरडून बोलणं अशा पद्धतीच्या त्रासाला अनेक प्रवाशांना सामोरं जावं लागलंय. इतकंच नाही तर काही प्रवासी आपल्या जीवाशी खेळत बसगाडीच्या फूटबोर्डवर उभे राहून मोबाईलवर बोलत असतात. यामुळे बसमध्ये चढणाऱ्या व उतरणाऱ्या सहप्रवाशांनाही त्रास होत असतो. त्यामुळेच सहप्रवाशांना त्रास होईल अशाप्रकारे वर्तन करणाऱ्या प्रवाशास मोटार वाहन नियम १९८९-१0२ (१) (५) अन्वये बसगाडीमधून खाली उतरविण्याचा बसवाहकास अधिकार देण्यात आलाय.

यापद्धतीच्या अनेक तक्रारी बेस्ट उपक्रमाकडे गेल्या काही महिन्यांमध्ये आल्या आहेत. अशा प्रकारावर नियंत्रण आणण्याची मागणीही प्रवाशांकडून होत होती. काही प्रवाशी मोबाईलवर बोलतच धावत बस पकडतात. तिकिट न घेताच मोबाईलवर खेळत व गाणी ऐकत राहतात. यामुळे बसवाहक व प्रवाशांमध्ये खटके उडण्याचे प्रकारही घडत आहेत. अखेर यावर निर्बंध आणण्यासाठी बेस्ट प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहेत.