'माणुसकीही नसलेल्या सालेमला फाशीच द्यायला हवी'

कुख्यात माफिया डॉन अबू सालेमला फाशी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी आज मुंबई सत्र न्यायालयात केलीय. प्रदीप जैन हत्या प्रकऱणात सालेम दोषी ठरला असून, कोर्टाच्या निकालाकडं आता सर्वाचं लक्ष लागलंय.

Updated: Feb 17, 2015, 07:40 PM IST
'माणुसकीही नसलेल्या सालेमला फाशीच द्यायला हवी' title=

मुंबई : कुख्यात माफिया डॉन अबू सालेमला फाशी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी आज मुंबई सत्र न्यायालयात केलीय. प्रदीप जैन हत्या प्रकऱणात सालेम दोषी ठरला असून, कोर्टाच्या निकालाकडं आता सर्वाचं लक्ष लागलंय.

'अबू सालेम तालिबानी विचारांचा आहे. त्याच्याकडे माणुसकीही नाही, अबू सालेमला फाशीच द्यायला हवी' अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी मुंबई सत्र न्यायालयात केलीय. 

बिल्डर प्रदीप जैन हत्या प्रकरणात अबू सालेम आणि त्याचा साथीदार मेहंदी हसन यांना कोर्टानं दोषी ठरवलंय. या प्रकरणी शिक्षेबाबत झालेल्या युक्तीवादाच्या वेळी निकम यांनी फाशीची मागणी केलीय. सालेम आणि हसन हे दोघं तालिबानी विचारांचे आहेत. माणुसकी नावाचा प्रकार त्यांच्याकडे अजिबात नाही. त्यामुळे त्यांना कमी शिक्षा झाल्यास अशा विचारांच्या गुन्हेगारांना अभय मिळेल असा युक्तीवाद निकम यांनी केलाय. मात्र, सालेमचं प्रत्यार्पण करताना पोर्तुगालशी झालेल्या करारानुसार सालेमला देहदंड देता येणार नाही, याकडं सालेमच्या वकिलांनी लक्ष वेधलंय.
 
1995 साली मुंबईतले बिल्डर प्रदीप जैन यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सालेमनं जैन यांच्याकडं 1 कोटींची खंडणी मागितली होती. मात्र, जैन यांनी 20 लाख रूपयेच देण्याचं कबूल केलं. तसंच फ्लॅटच्या विक्रीतून झालेला फायदाही शेअर कऱण्यास नकार दिला. त्यामुळे जैन यांची हत्या करण्यात आली. 

अबू सालेमवर तब्बल 24 गुन्ह्यांची नोंद आहे...
- 1993 मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी सालेमवर गुन्ह्याची नोंद आहे. 
- बिल्डर प्रदीप जैन हत्या प्रकरणात सालेम दोषी ठरलाय.
- मनिषा कोईरालाचा पीए अनिल देवाणी हत्या प्रकरणातही तो आरोपी आहे.
- दिल्लीत एका उद्योगपतीच्या हत्येचाही त्याच्यावर आरोप आहे. 
- खंडणीचे ३ आणि बनावट पासपोर्टप्रकरणी दोन गुन्ह्यांची नोंद सालेमवर आहे. 

2005 मध्ये सालेमचं पोर्तुगालमधून भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आलं. प्रत्यार्पण करतेवेळी पोर्तुगालनं भारतासमोर काही अटी ठेवल्या होत्या. यामध्ये, 
- भारताला सालेमला फाशीची शिक्षा देता येणार नाही
- सालेमविरोधात २५ वर्षांपेक्षा जास्त शिक्षेचे खटले चालवता येणार नाहीत
- सर्व अटी मान्य असल्याची भारत सरकारनं पोर्तुगालला लेखी हमी दिली होती.
 
नेमक्या याच अटींमुळे सालेमचं फावतंय. सालेमविरूद्ध नोंदवलेले 24 पैकी 8 गुन्हे गंभीर आहेत. मात्र, बिल्डर प्रदीप जैन हत्या प्रकरणी पहिल्यांदाच अबू सालेम दोषी ठरलाय. या गुन्ह्याची तीव्रता पाहता सालेमला फाशी व्हावी अशी मागणी करण्यात येतेय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.