www.24taas.com, मुंबई
ग्राहकांना अनुदानित किमतीत सहा सिलिंडरच देण्यात येतील, या सरकारच्या निर्णयानंतर सर्वसामान्या ग्राहकांची डोकेदुखी चांगलीच वाढलीय. ग्राहकाला सातवा सिलिंडर चांगलाच महाग पडणार आहे.
सवलतीच्या दरातील सहा सिलिंडरनंतरच्या सातव्या सिलिंडरसाठी (विना सबसिडी) ऑक्टोबर महिन्यात तब्बल ९१४ रुपये मोजावे लागणार आहेत. खरं तर, या महिन्यात विना सबसिडीच्या सिलिंडरची किंमत मुंबईत ७६७ रुपये असेल, असं जाहीर करण्यात आलं होतं.
राज्यातील इतर महापालिकांमध्ये, कररचनेत थोडाफार फरक असल्यानं तिथल्या नागरिकांना सातव्या सिलिंडरसाठी मुंबईपेक्षा ५ ते १५ रुपये कमी - जास्त भरावे लागतील, असं गणित मांडण्यात आलं होतं. पण, सवलतीच्या सहा सिलिंडरनंतर सातव्या सिलिंडरपासूनचे दर प्रत्येक महिन्याला नव्याने निश्चित करण्याचा अधिकार तेल कंपन्यांना आहे. त्याचाच पुरेपूर वापर करत कंपन्यांनी आपल्या वितरकांना १ ऑक्टोबरला नवा ई-मेल पाठवला आणि सातव्या सिलिंडरची किंमत १२५ ते १५० रुपयांना वाढवण्यास सांगितलं. त्यामुळे आता मुंबईकरांना हा सिलिंडर ९१४ रुपयांना पडणार आहे.