मुंबई : गाढवं मेलं ओझ्यानं आणि शिंगरु मेलं हेलपाट्यानं... अशी आपल्याकडे एक म्हण आहे.. सध्या लहानग्यांच्या बाबतीत असचं काहीसं घडतंय. एकीकडे राज्य सरकारनं दप्तराचं ओझं कमी व्हावं म्हणून पावलं उचलायला सुरुवात केलीय. पण, विद्यार्थ्यांवरचे एज्युकेशनल अत्याचार थांबायला तयार नाहीत आणि हे अत्याचार खुद्द पालकांकडूनच होतायत.
पाचवीतली मुलं करतायेत आयआयटी प्रवेशाचा अभ्यास
सीए, मेडिकलसाठीही मुंबईत पाचवीपासून क्लास
स्पर्धेच्या युगात पालकांकडून लहानग्यांवर एज्युकेशनल अत्याचार
कारण बारावी बोर्डाच्या परीक्षेनंतर आयआयटी, मेडिकल, सीए यासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास विद्यार्थी चक्क पाचवीपासूनच करतायेत. आश्चर्य वाटलं ना... पण हे पहा या कोचिंग क्लासेसनं यासाठी खास वर्ग सुरु केलेत. पाचवीच्या या चिमुरड्यांकडून आयआयटी, मेडिकलच्या प्रवेश परिक्षांची तयारी इथं करवून घेण्यात येतेय... या क्लासेसच्या फीसाठी पालक प्रत्येक वर्षाला मोजतायेत ६० हजार रुपये...
ज्या वयातं खेळावं बागडावं त्या वयात या अनाहूत अभ्यासाच्या ओझ्यानं या लहानग्यांचं लहानपणच हिरावून नेण्याचा हा प्रयत्न आहे, असं मानसशास्त्रज्ञांचं पण म्हणणं आहे.
डर्बी स्पर्धेत पळवण्यासाठी घोड्यांची तयारी करवून घेणाऱ्यांत आणि या पालकांत काय फरक मानायचा.
आपल्या मुलानं काय किंवा मुलीनं काय.. मोठं होवून चांगलं करिअर करावं, असं प्रत्येकालाच वाटतं... त्यात काही गैर नाही. त्यासाठी मुलांना अभ्यासाची गोडी लावणं यातही काही गैर नाही. मात्र, त्यासाठीची ही रेस जीवघेणी तर नाही ना... या स्पर्धेत मुलांचा कल कोणत्या विषयाकडे आहे, याकडेही दुर्लक्ष होत नाहीये ना... आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे या निरागस लहानग्याचं बालपण तर आपण कुस्करत नाहीये ना... याचा विचारही या सूज्ञ पालकांनी करायला हवा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.