मुंबईत ५५२ धोकादायक इमारतींची भर

प्रत्येक वर्षी पावसाळा आल्यानंतर मुंबईतल्या धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो. मागील वर्षी धोकादायक म्हणून जाहीर केलेल्या ७७२ इमारतींवरील बीएमसीची कारवाई यंदाचा पावसाळा आला तरी संपलेली नाही. त्यातच यंदाही ५५२ धोकादायक इमारतींची भर पडली आहे. 

Updated: Jun 11, 2015, 09:23 AM IST
मुंबईत ५५२ धोकादायक इमारतींची भर  title=

कृष्णात पाटील, मुंबई : प्रत्येक वर्षी पावसाळा आल्यानंतर मुंबईतल्या धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो. मागील वर्षी धोकादायक म्हणून जाहीर केलेल्या ७७२ इमारतींवरील बीएमसीची कारवाई यंदाचा पावसाळा आला तरी संपलेली नाही. त्यातच यंदाही ५५२ धोकादायक इमारतींची भर पडली आहे. 

मुंबईतल्या धोकादायक इमारती खाली करून त्या तात्काळ पाडल्या जात नसल्यानं मानवी जीवाची फार मोठी किंमत अनेकदा मोजावी लागलीय. मागील वर्षी मुंबई महापालिकेनं ७७२ इमारती अती धोकादायक म्हणून जाहीर केल्या होत्या. त्यातल्या सुमारे २५० इमारती मोकळ्या करून पाडण्याचं काम सुरू आहे. तर उर्वरीत प्रकरणात कोर्टानं स्टे दिला असल्यानं बीएमसी आता या प्रकरणांमध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे.

यावर्षीही बीएमसीनं ५५२ इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर केल्या आहेत. या इमारतींना पालिकेनं आता नोटीसा देण्यास सुरूवात केलीय. याव्यतिरिक्त बीएमसीच्या मालकीच्या १२४ इमारतीही अतिधोकादायक स्थितीत आहेत. 

धोकादायक इमारतींमध्ये राहणा-या रहिवाशांचा इमारत खाली करण्यासाठी प्रतिसाद मिळत नसल्याचा अनुभव प्रशासनाला आहे. यामध्ये रहिवाशांचीही काही चूक नाही. कारण ट्रान्झिट कॅम्पमध्ये वर्षानुवर्षं सडत असलेल्या लोकांचा अनुभव ते ऐकून आहेत. त्यातच एकदा सोडलेलं घर परत कधी मिळेल याचीही खात्री नाही. तसंच सरकार, पालिका आणि बिल्डरांवर विश्वास नसल्यानं, नागरिक धोकादायक इमारतीतच राहणं पसंत करतात. 

जीव मुठीत घेवून जगणा-या या इमारतींमधल्या रहिवाशांना जबरदस्तीने बाहेर काढण्याऐवजी, त्यांना तिथंच लवकरात लवकर घर मिळवून देणं गरजेचं आहे. त्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. नाही तर दरवर्षी घडणाऱ्या इमारत दुर्घटनांमधून काहीच धडा घेतला गेला नाही, अशी चर्चा आहे.  

ठळकबाबी
- मागील वर्षी महापालिकेकडून ७७२ इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर 
- त्यापैकी सुमारे २५० इमारती मोकळ्या करून पाडण्याचं काम सुरू 
- उर्वरीत प्रकरणात कोर्टानं स्टे दिल्यानं बीएमसी प्रतिज्ञापत्र दाखल करणार 
- यावर्षी बीएमसीकडून ५५२ इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर 
- या इमारतींना पालिकेकडून नोटीस द्यायला सुरुवात 
- बीएमसीच्या मालकीच्या १२४ इमारतीही अतिधोकादायक स्थितीत 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.