मुंबई : मुंबईत एका सैनिकाच्या पत्नीच्या ड्रायव्हिंग शिकण्याच्या नादात दोन मुलांना आपला जीव गमवावा लागलाय. पोलिसांनी सैनिक पती आणि पत्नीला अटक केलीय.
लष्करात लान्स नायक म्हणून कार्यरत असणारे 36 वर्षीय संतोष कुमार त्यांची 34 वर्षीय पत्नी संगिता राय यांना चार चाकी गाडीवर ड्रायव्हिंग शिकवत असताना ही घटना घडलीय. उल्लेखनीय म्हणजे, यावेळी संगिता यांच्याकडे ड्रायव्हिंग किंवा लर्निंग लायसन्स नसताना त्या आपल्या राहत्या परिसरात गाडी चालवणं शिकत होत्या.
'टाईम्स'नं दिलेल्या माहितीनुसार, संगिता या दक्षिण मुंबई भागातील नेव्ही नगर परिसरात सॅन्ट्रो गाडी चालवणं शिकत असताना अक्षांसा ज्ञानी (12 वर्ष) आणि अभय (7 वर्ष) हे दोघे सख्खे भाऊ परिसरात सायकलवर चालवत होते.
समोरुन सायकलवर येणाऱ्या मुलांना पाहून गोंधळलेल्या संगिता यांनी चुकून ब्रेकवर पाय देण्याऐवजी एक्सलेटरवर पाय दिला... यामुळे एक मुलगा संगिता यांच्या गाडीखाली येऊन जागीच ठार झाला तर दुसरा मुलगा बोनेटवर फरपटत जाऊन समोरच्या झाडावर आदळला आणि त्याचाही जागीच मृत्यू झाला.
यामुळे, घाबरलेल्या पती-पत्नीनं घटनास्थळावरून पोबारा केला. परंतु, काही वेळानंतर त्यांनी कफ परेड पोलिसांसमोर शरणागती पत्करली.