झी २४ तास वेब टीम, मुंबई
तुमची मुलं घरात कुणीही नसताना टीव्ही बघत असतील, किंवा इंटरनेट सर्फ करत असतील तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा. आणि या धोक्याचं कारण ठरलं आहे 'बिग बॉस' या सीरियलमधला सनी लिओन या पॉर्नस्टारचा सहभाग. सध्या दहा ते पंधरा वर्षांची मुलं इंटरनेटवर सनी लिओनच्या क्लिप्स पाहतात. सनी लिओन ही अमेरिकेतली प्रसिद्ध पॉर्नस्टार असल्यानं सहाजिकच तिच्या व्हीडिओ क्लिप्स अश्लील आहेत. धक्कादायक बाब म्हणजे लहान मुलं या व्हीडिओ क्लिपिंग्सच्या आहारी जातात. गेल्या दोन आठवड्यांत बरेचसे पालक त्यांच्या मुलांना यासंदर्भात मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन आल्याचं समोर आलं आहे.
सनी लिओनचं मूळ नाव करेन मल्होत्रा आहे. तिचा जन्म कॅनडात झाला. अमेरिकेत प्रसिद्ध पॉर्नस्टार म्हणून सनी लिओनची ओळख आहे. फॅशन मॅगझिननं तिला जगातल्या टॉप पॉर्नस्टारमध्येही स्थान दिले आहे.मुळात भारतामध्ये अशा पॉर्न फिल्म्सना मान्यता नसल्यानं लहान मुलांना आतापर्यंत पॉर्नस्टार हा विषय माहित नव्हता. पण सनी लिओनच्या बिग बॉसमधल्या सहभागामुळे लहान मुलांपर्यंत हा विषय सहज पोहोचला. या सगळ्याच्या आहारी जाण्यापासून मुलांना वाचवायचं असेल तर.
तुमची मुलं टीव्ही किंवा इंटरनेटवर काय बघतात, याकडे लक्ष ठेवा. शक्य असल्यास टीव्हीला चाईल्ड लॉक लावा. आक्षेपार्ह वेबसाईटस बॅन करा. आणि मुख्य म्हणजे मुलांशी सतत संवाद ठेवा. धकाधकीच्या आयुष्यात मुलांना चार गोष्टी चांगल्या शिकवायला वेळ नसेल, तरी किमान वाईट गोष्टींच्या आहारी लहान मुलं जाऊ नयेत, याची खबरदारी प्रत्येकानं घ्यायलाच हवी.