राज यांच्या 'उड्डाणा'वरून नवा वाद

गुजरात दौ-यावर निघालेल्या राज ठाकरे यांच्यासाठी गुजरात मेल दादरला तासभर थांबवावी अशी मनसेची विनंती पश्चिम रेल्वेने नाकारली. त्यामुळे त्यांना विमानाने जावे लागले असे वृत्त एका सायंदैनिकाने प्रसिद्ध केले.

Updated: Aug 3, 2011, 10:21 AM IST

[caption id="attachment_138" align="alignleft" width="300" caption="राज यांचा विमानवारीमुळे नवा वाद"][/caption]

झी 24 तास वेब टीम, मुंबई

 

गुजरात दौ-यावर निघालेल्या राज ठाकरे यांच्यासाठी गुजरात मेल दादरला तासभर थांबवावी अशी मनसेची विनंती पश्चिम रेल्वेने नाकारली. त्यामुळे त्यांना विमानाने जावे लागले असे वृत्त एका सायंदैनिकाने प्रसिद्ध केले. पण या वृत्ताचा इन्कार करताना आपली प्रकृती बरी नसल्याने विमानाने आलो , असा खुलासा राज यांनी केला.

 

गुजरातची प्रगती पाहण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे मोठ्या लवाजम्यासह गुजरात मेलने गांधीनगरला पोहचणार होते. त्यांच्यासोबत मनसेचे आमदार , नगरसेवक ,कार्यकर्ते आणि पत्रकार असे बरेचजण असणार होते. त्यांना सोयीचे व्हावे म्हणून ही ट्रेन मुंबई सेंट्रलऐवजी दादरहून सोडावी किंवा दादरला तासभर थांबवावी अशी विनंती मनसेकडून करण्यात आली होती , असे या वृत्तात म्हटले आहे.

 

सहा महिन्यांपूवी विदर्भात कोर्टाच्या सुनावणीसाठी जाताना मध्य रेल्वेने राज यांच्यासाठी विशेष बोगी जोडली होती. तशीच वागणूक पश्चिम रेल्वेकडूनही मिळेल अशी मनसेच्या पदाधिका-यांची अपेक्षा होती. पण या वृत्तानुसार , पश्चिम रेल्वेने वेळापत्रकाचा बोजवारा उडू नये यासाठी गुजरात मेल अधिक वेळ दादरला थांबवणे शक्य नसल्याचे सांगत , ही विनंती नाकरली.

 

या सा-या प्रकरामुळे राज ठाकरे या ट्रेनने गुजरातकडे जाऊ शकले नाहीत. पंरतु मनसेचे अन्य पदाधिकारी आणि इतर अनेकजण या ट्रेनने गुजरातमध्ये पोहोचले. राज, त्यांची पत्नी शर्मिला हे दोघे जेट एअरवेजच्या विमानाने गांधीनगरला पोहोचले. त्यांच्या या अचानक बदललेल्या कार्यक्रमामुळे सारेच जण चकित झाले.

 

याबद्दल मनसेच्या पदाधिका-यांनीही वेगवेगवळी उत्तरे दिली. चित्रपट कर्मचारी सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी राज यांना दुस-या काही मह्त्त्वाच्या भेटीगाठी असल्याचे सांगितले. तर आणखी एका पदाधिका-याने प्रचंड पाऊस आणि वैतरणा येथे खचलेल्या पुलामुळे राज ठाकरे रेल्वेतून न आल्याचे सांगितले.

 

पण या विषयी राज ठाकरे यांना साबरमती येथे विचारले असता ते म्हणाले , की मला गेले काही दिवस सर्दी-खोकल्याचा त्रास होतो आहे. त्यामुळे मला प्रवास एक दिवस पुढे ढकलावा लागला. त्यामुळे तिकिट असूनही मी काल रेल्वेने येऊ शकलो नाही. त्याऐवजी आज विमानाने येणे मी पसंत केले. आम्ही अशी कोणतीही विनंती रेल्वेला केली नव्हती.