मुंबईत टॅक्सी भाड्यात वाढ

मुंबईत टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे. टॅक्सीचे किमान भाडे १६ रुपये होते ते आता १७ रुपये करण्यात आले आहेत

Updated: Mar 14, 2012, 08:16 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईत टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे. टॅक्सीचे किमान भाडे आता १६ रुपये होते ते आता १७ रुपये करण्यात आले आहेत. टॅक्सीच्या किमान भाड्यात एक रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबईत किमान भाड्यानंतर प्रति किलोमिटरसाठी ५० पैसे अधिक मोजावे लागणार आहे.

 

तर नवी मुंबईत रिक्षाच्या भाड्यात चार रुपयांची कपात करण्यात आली आहे. नवी मुंबईत सध्या किमान भाडे १५ रुपये होते ते आता ११ रुपये करण्यात आले आहे. भाडेवाढ आणि कपात दोन्ही १८ मार्चपासून लागू करण्यात येणार आहे. पुढील प्रत्येक किलोमिटरसाठी साडे नऊ रुपये आहे ते सात रुपये होणार आहे.

 

 

विशेष म्हणजे रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्यात यावी या मागणीसाठी रिक्षा-टॅक्सी संघटनेने संपाचा इशारा दिला होता. मुंबईत १६ एप्रिलपासून रिक्षा युनियनने बेमुदत संपाचा इशारा दिला होता. भाडेवाढीची मागणी मान्य न झाल्यास संपाचे हत्यार उपसावे लागेल असं युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी म्हटलं होतं.

 

आज मंत्रालयात होणारी भाडेवाढी संदर्भातली बैठक पुढे ढकलण्यात आल्यानंतर राव आक्रमक झाले आहेत. रिक्षाचे किमान भाडे १७ ते २० रुपयांदरम्यान असावं अशी युनियनची मागणी आहे.

 

दरम्यान विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असतानाच इलेक्टॉनिक मीटर सक्तीविरोधात नागपुरातल्या रिक्षा चालकांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारलाय. सरकारनं इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती केलीय. सरकारच्या या निर्णयाविरोधात ऑटोचालक संघटनेने हा संप पुकारलाय. संपाच्या या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला, मात्र ऑटो चालकांच्या या संपामुळे दहावीची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना फटका बसलाय.

 

संपामुळे परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशिर झाल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. शिवाय इतर शाळकरी विद्यार्थ्यांनाही शाळेत वेळेवर पोहचण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला.