www.24taas.com, मुंबई
मुंबईतील मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर पाच दिवसांनंतर मंत्रालयातील कामकाज आजपासून सुरू होणार आहे. त्यामुळे पुन्हा गजबजणार आहे. अग्नितांडवानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा मंत्रालयाच्या उभारणीसाठी अहोरात्र झटली आहे. आज सोमवारपासून तळमजला अधिक तीन मजल्यांवर कामकाज होत आहे.
मंत्रालयाला गुरुवारी लागलेल्या आगीत चार मजले भस्मसात झाले होते. त्यानंतर मंत्रालय पुनर्निर्माण करायचे ते खासगी लोकांकडून की शासनाने यावर खल सुरू झाला असताना सरकारने मंत्रालयाचा पुनर्विकास करावा, असा सल्ला केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. त्याच काळात सध्या जळालेल्या मजल्यांच्या ठिकाणी पुन्हा बांधकाम करण्यासह इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट तज्ज्ञांकडून करण्यात आले. गेले तीन दिवस मंत्रालयाचे स्वरूप पालटण्यासाठी शेकडो अभियंते, मजूर व कर्मचारी काम करत आहेत.
मुख्यमंत्री चव्हाण हे पहिल्या मजल्यावरील आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या दालनातून कामकाज करणार आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे दुसऱ्या मजल्यावरील जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या दालनातून काम करणार आहेत.
मंत्रालयाच्या विस्तारित भागात रविवारी वीजपुरवठा सुरू करण्यात आला असून चारही मजल्यांवरून जळालेले सामान युद्धपातळीवर काढण्याचे काम सुरू आहे. साफसफाईचे कामही जोरात सुरू असून रंगसफेदीही करण्यात येतआहे. सोमवारी अनेक मंत्री मंत्रालयात येऊन आपल्या खात्याचे काम करतील. मंत्रालयावर रविवारी तिरंगा फडकविण्यात आला.