www.24taas.com, मुंबई
मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. रेल्वे स्टेशन्सवर प्रवाशांची गर्दी उसळल्याने अर्धा ते एक तासाने धावणाऱ्या रेल्वेमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप करावा लागला.
ऑफिस आणि इच्छित स्थळ गाठण्यासाठी प्रवाशांनी रेल्वे सोडून रिक्षा आणि टॅक्सीचा पर्याय निवडण्याचा निर्णय घेतला. मात्र आज प्रवाशांनी घेतलेला निर्णय त्यांच्या चांगलाच अंगाशी आला. मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याचं पाहून रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी अव्वाच्या सव्वा भाडं वसुली करण्यास सुरुवात केली होती.
रेल्वे स्टेशनबाहेर हाताशपणं उभे असलेले प्रवासी रिक्षा आणि टॅक्सीचालकांना अव्वाच्या सव्वा भाडं मोजत होते. अशावेळी रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षांना नियंत्रित करण्यासाठी वाहतूक पोलीस नव्हते. त्यामुळं रिक्षाचालकांचं चांगलच फावलं होतं. प्रवासी अक्षरशः रिक्षाचालकांच्या मागं धावताना दिसत होते.
मध्य रेल्वेच्या सिग्नल बिघाड दुरुस्तीला दोन ते तीन दिवस लागणार आहेत. सिग्नल बिघाडाचा लांब पल्ल्याच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. प्रगती, सिंहगड, गोदावरी आणि राज्यराणी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.