नक्षलवादावरून 'दादा-आबां'मध्ये वाद

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नक्षलवादाच्या मुद्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना टार्गेट केलंय. काल रात्री उशीरा झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यात वाढत असलेल्या नक्षलवादाचा मुद्दा उपस्थित केला.

Updated: Jun 7, 2012, 08:14 AM IST

www.24taas.com, मुंबई

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नक्षलवादाच्या मुद्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना टार्गेट केलंय. काल रात्री उशीरा झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यात वाढत असलेल्या नक्षलवादाचा मुद्दा उपस्थित केला.

गडचिरोलीमध्ये पोलिसांचे राज्य नसून नक्षलवाद्यांचे राज्य असल्याची टीका करत अजितदादांनी थेट आर. आर. पाटील यांच्यावर हल्ला केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. अजितदादांच्या या अचानक हल्ल्यांनं आश्चर्यचिकित झालेल्या आबांनी गडचिरोलीत अधिकारी जायला तयार नसल्याचं सांगत आपली हतबलता व्यक्त केली. अजितदादांनी आबांवर केलेल्या या टीकेला विदर्भातील सर्वपक्षीय मंत्र्यांनी पाठिंबा देत गडचिरोलीतील लोक सुरक्षित नसल्याची बाब समोर आणली.

मंत्रिमंडळात बैठकीत हा विषय नसतानाही अजितदादांनी आयत्या वेळचा विषय म्हणून या मुद्याला तोंड फोडले. शेवटी मुख्यमंत्र्यांनी नक्षलवादावर एखाद्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्याचे मान्य करून हा विषय संपवला. मात्र अजितदादा विरुद्ध आबा असा संघर्ष दुस-यांदा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पहायला मिळाला. यापूर्वी दुष्काळाच्या मुद्यावर दादा-आबांची जुगलबंदी झाली होती.