दीपक भातुसे, www.24taas.com, मुंबई
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतरही कृपाशंकर सिंह यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेली नाही. हायकोर्टाच्या आदेशानंतर त्यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरुन गच्छंती केली खरी, मात्र पक्षातून हकालपट्टी कधी, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलाय. तसंच कृपांवर कारवाईसाठी पोलिसांचा विलंब का, हाही प्रश्न विचारण्यात येतोय.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अडचणीत आलेल्या कृपाशंकर सिंह यांच्यानिमित्तानं काँग्रेस पक्षही अडचणीत सापडलाय. 2 जी घोटाळा, सुरेश कलमाडी यांच्यापाठोपाठ कृपांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या कोटींच्या कोटी उड्डाणानं सर्वसामान्य जनतेत काँग्रेसची बेअब्रू झाली. मात्र तरीही कृपांवर निलंबनाची कारवाई करण्यास पक्ष अजूनही धजावत नाही. हायकोर्टाच्या आदेशानंतर कृपांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन उचलबांगडी केली खरी. मात्र त्यासाठीही मुंबई मनपा निवडडणुकीच्या पराभवाचं कारण देण्यात आलंय. त्यातच हायकोर्टाच्या आदेशानंतरही कृपांवर कारवाईस झालेल्या विलंबानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. यानिमित्तानं राजकीय विरोधकांना कृपांसोबतच काँग्रेसला टार्गेट करण्याची आयती संधीच चालून आली आहे.
कृपावर कारवाईला जाणिवपूर्वक उशीर झाल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर कृपांवर तातडीनं कारवाई न करता त्यांना पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ दिला गेल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलाय. त्यामुळं मुंबईचे पोलीस आयुक्त आणि काँग्रेस नेत्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेनं केली, तर भाजपनंही या मुद्द्यावर काँग्रेसला धरेवर धरलंय.
कृपांवर हायकोर्टाच्या आदेशानंतर आणि गुन्हे दाखल झाल्यानंतरही कारवाईबाबत काँग्रेसकडून टाळाटाळीचीच उत्तर मिळत आहेत.त्यामुळं काँग्रेस कृपांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न का करतंय, असा सवाल विचारण्यात येतोय.
दुसरीकडं पोलिसांची कारवाई योग्य रितीनंचं सुरु असल्याचं सांगत गृहमंत्र्यांनी याप्रकरणी पोलिसांची पाठराखण केलीय. एकूणच कृपांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाची झळ सरकारमधल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारलाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आदर्श, कलमाडी प्रकरणांमुळं अधिक नाचक्की झालेली काँग्रेस या प्रकरणावेळी तरी शहाणी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र कृपांवर कारवाई टाळून काँग्रेसनं विरोधकांच्या हाती आयतं कोलीत दिलंय.