झी २४ तास वेब टीम, मुंबई
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा हेतू स्वच्छ आहे. त्यामुळं राज्य सरकारनं त्यांना त्यांच्या आंदोलनासाठी एमएमआरडीए मैदान सवलतीच्या दरात उपलब्ध करुन द्यावं अशी भूमिका मनसेनं घेतलीय. जनलोकपाल विधेयकासाठी सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीत अण्णाचं उपोषण मुंबईत होणार आहे.
य़ा आंदोलनासाठी सध्या टीम अण्णांकडून जागेची पाहाणी होतेय. एमएमआरडीएचं मैदानाची मागणी टीम अण्णांनी केलीय, मात्र त्याचं लाखो रुपयांचं भाडं परवडणारं नसल्याचं टीम अण्णांचं म्हणणं आहे.मैदानाचं भरमसाठ भाडं कमी विनंती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना टीम अण्णांनी केलीय. अन्यथा आझाद मैदानाचा पर्याय टीम अण्णांना वाटतोय.
मात्र मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेवर पडणारा ताण लक्षात घेता आंदोलनाच्या जागेचा विषय दोन्ही बाजूंकडून ताणण्यात येऊ नये असं मत बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलंय.