www.24taas.com, मुंबई
मुंबई महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी संदर्भातील आज सकाळी झालेली बैठक तोडग्या विना संपली. सायंकाळी पुन्हा दोन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन वार्ड निहाय आढावा घेणार असल्याची माहिती झी २४ तासला दोन्ही पक्षातील सूत्रांनी दिले.
महापालिकेत आघाडी संदर्भात आज सकाळी काँग्रेसच्या नेत्यांची मुख्यमंत्री निवासस्थानी बैठक झाली. त्यात आघाडी संदर्भात काय रणनिती आखायची, याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, याच वेळी दुसरी बैठक सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली. त्यात त्यांनीही काँग्रेससमोर किती जागांची मागणी करायची हे निश्चित केले.
त्यानंतर पुन्हा दोन्ही पक्षातील नेत्यांची तिसरी बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झाली. त्यात आघाडी संदर्भात चर्चा झाली. यावेळी दोन्ही पक्षांनी आघाडी करण्याचे निश्चित केले असून काँग्रेसने राष्ट्रवादीला ३५ पेक्षा अधिक जागा देण्याचे तत्वतः मान्य केले आहे.
दरम्यान, आज सायंकाळी होणाऱ्या दोन्ही पक्षांच्या बैठकीत वॉर्ड निहाय आढावा घेण्यात येणार असून अंतीम निर्णय उद्या होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी झी २४ तासला दिली आहे.