अजित पवारांचा फ्युज उडाला

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे माझ्या कार्यपद्धतीविषयी नाराज असतील, तर कॉंग्रेसने माझे ऊर्जामंत्री खाते काढावे, असे परखड मत उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केले.

Updated: Oct 15, 2011, 01:03 PM IST

 

झी २४ तास वेब टीम, मुंबई

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे माझ्या कार्यपद्धतीविषयी नाराज असतील, तर कॉंग्रेसने माझे ऊर्जामंत्री खाते काढावे,  असे परखड मत उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केले.

 

लोडशेडिंगवरून सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपल्याने नवा वाद र्निमाण झाला आहे. राज्यातल्या लोडशेडिंगवरून काँग्रेसनं अजित पवार यांना लक्ष केलं होतं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केली होती. त्यावर हवं तर माझं खातं काढून घ्या, अशा शब्दांत अजित पवार माणिकराव ठाकरेंवर कडाडले आहेत. एकूणच लोडशेडिंगवरून विरोधकांनी सत्ताधारी आघाडीला लक्ष केलं असताना काँग्रेस राष्ट्रवादीती वाद चव्हाट्यावर आला आहे.

 

कॉंग्रेस प्रदेश अध्यक्षांनी माझ्या कार्यपद्धतीविषयी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे तक्रार केली आहे. जर कॉंग्रेसच्या गोटात माझ्यासंदर्भात नाराजी असेल तर मुख्यमंत्र्यांनी माझे ऊर्जामंत्री खाते काढावे. माझी तशी तयारी आहे, असे अजित पवार म्हणाले.

 

माणिकरावांनी वीज टंचाई दूर करण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घ्यावा, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवून अजित पवार यांना डिचवले होते. ही बाब अजित पवार यांच्यावर अविश्‍वास दाखविणारी असल्याची भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केली होती.