www.24taas.com, मुंबई
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप आणि रिपाइंच्या जागावाटप अखेर निश्चित झाल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. मुंबईतील दादरच्या शिवसेना भवनात महायुतीच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, रिपाइचे अध्यक्ष रामदास आठवले, सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी उपस्थित होते.
शिवसेना १३५, भाजप ६३ आणि रिपाइं २९ असा फॉम्युला घेऊन मुंबई महापालिकेच्या निवडणुकींना सामोरे जाणार असल्याची घोषणा महायुतीच्या नेत्यांनी केली.
महाराष्ट्रासाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचं उद्धव ठाकरेंनी यांनी सांगितलं तसंच राज्यातील जनता या महायुतीचे स्वागत करेल असंही ते म्हणाले. अनेक वर्षांचे महायुतीचे स्वप्न साकार झाल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. राज्य सरकारनं मुंबईसाठी काय केलं असा खडा सवालही त्यांनी विचारला. काँग्रेसला आता आमची खरी ताकद काय आहे असं जणू आव्हानच उद्धव ठाकरेनी दिलं. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होण्याची आम्ही वाटच बघत होतो, हे सांगून उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकलं.
आघाडीची सत्ता उलथवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचं सांगताना रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन पैलवानांना आम्ही तीन पैलवान चित करू, अशी टिप्पणी केली. मुलुंड, विक्रोळी आणि वरळीच्या जागांसाठी आम्ही आग्रही असलो तरी जागा वाटपाच्या वादावरुन युती तुटू नये अशी आमची भूमिका असल्याचं रामदास आठवलेंनी सांगितले. आमचं खरं मिशन २०१४ आहे असं आठवलेंनी सांगितलं. आगे आगे देखो होता है क्या ही त्यांची खास प्रतिक्रिया बरचं काही सांगून जाणारी होती.