'कानडी मोगलाई'चा निषेध... आज निपाणी बंद!

 सीमावर्ती भागातल्या येळ्ळूरमध्ये कर्नाटक सरकारची दडपशाही सुरुच आहे. महाराष्ट्र राज्य या फलकावरुन निर्माण झालेल्या वादानंतर कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषिकांना अमानुष मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ आज निपाणी बंदचं आवाहन करण्यात आलंय.

Updated: Jul 28, 2014, 10:11 AM IST
'कानडी मोगलाई'चा निषेध... आज निपाणी बंद! title=
फाईल फोटो

येळळूर : सीमावर्ती भागातल्या येळ्ळूरमध्ये कर्नाटक सरकारची दडपशाही सुरुच आहे. महाराष्ट्र राज्य या फलकावरुन निर्माण झालेल्या वादानंतर कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषिकांना अमानुष मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ आज निपाणी बंदचं आवाहन करण्यात आलंय.

आधी येळ्ळूरमधला मराठी फलक काढला... मग कर्नाटक पोलिसांची मुजोरी... मराठी भाषिकांना अमानुष मारहाण... कानडी सरकारची ही मोघलाई सुरू आहे सीमाभागातल्या येळ्ळूरमध्ये... कर्नाटक सरकारची दडपशाही आणि महाराष्ट्र द्वेषाची साक्ष देणारंच हे सगळं दृश्यं होतं... कर्नाटक पोलिसांनी घरात घुसून मराठी भाषिकांना अमानुष लाठीमार केला. याला निमित्त ठरलंय ते येळ्ळूरमधला एक बोर्ड... 

शुक्रवारी येळ्ळूर गावाच्या सीमेवर 1956 सालापासून असलेला महाराष्ट्र राज्य हा बोर्ड उच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधीच हटवण्यात आला. गावाच्या पंचायतीवर असलेल्या भगवा झेंडा काढण्याचे आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिले होते.

मात्र, बोर्डाबाबत निकाल येण्याआधीच कर्नाटकच्या अधिकाऱ्यांनी हा बोर्डही तोडला. त्यानंतर शनिवारी महाराष्ट्र एकीकरण समितीनं शनिवारी हा बोर्ड पुन्हा एकदा उभारला. मराठी भाषिकांची हीच एकी पाहून कर्नाटक पोलिसांचे धाबे दणाणलं... येळ्ळूरमधला बोर्ड पुन्हा हटवण्यात आला... इतकंच नाही तर बिथरलेल्या कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषिकांवर अमानुष लाठीचार्ज केला.

या अमानुष मारहाणीचा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी निषेध केलाय. तसंच महाराष्ट्र सरकारवरही टीका केलीय. मराठी भाषिकांना झालेल्या या मारहाणीच्या निषेधार्थ आता सोमवारी निपाणी बंदचं आवाहन करण्यात आलंय. मात्र, कर्नाटक सरकार आणि पोलिसांची ही मुजोरी थांबणार कधी असा संतप्त सवाल आता उपस्थित करण्यात येतोय.
  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.