कुरडई - पापड खरेदी करा ऑनलाईन!

उन्हाळा सुरु झाला की विशेषतः ग्रामीण भागात वाळवणाची लगबग सुरु होते. पण आता काळाच्या ओघात नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आणि घरी वाळवणाचे पदार्थ करणं कठीण होऊ लागलं. हीच गरज ओळखून नांदगावमधल्या स्मिता रत्नपारखी यांनी पापड कुरडयांची ऑनलाईन विक्री सुरू केलीय.  

Updated: May 2, 2016, 11:07 PM IST
कुरडई - पापड खरेदी करा ऑनलाईन! title=

नाशिक : उन्हाळा सुरु झाला की विशेषतः ग्रामीण भागात वाळवणाची लगबग सुरु होते. पण आता काळाच्या ओघात नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आणि घरी वाळवणाचे पदार्थ करणं कठीण होऊ लागलं. हीच गरज ओळखून नांदगावमधल्या स्मिता रत्नपारखी यांनी पापड कुरडयांची ऑनलाईन विक्री सुरू केलीय.  

www.kurdaipapad.com

सध्या नांदगाव-येवल्यामधल्या घरोघरी लगबग सुरू आहे ती पापड आणि कुरडयांची... बटाट्याचे चिप्प्स, तांदळाचे पापड, नाचणीचे पापड हे सगळे वाळवणाचे पदार्थ करण्याचं काम जोरदार सुरू आहे. एरव्ही हे फावल्या वेळात आणि साठवणीचे करायचे पदार्थ... पण काळ बदलला... शहरातल्या आणि काही प्रमाणात गावातल्या महिलाही नोकरीमध्ये व्यस्त झाल्या... आणि हे वाळवणाचे पदार्थ घरी आयते येऊ लागले. हीच गरज ओळखून नांदगाव मधल्या महिलांनी या पदार्थांच्या विक्रीसाठी वेबसाईट सुरू केलीय. स्मिता रत्नपारखी यांच्या पुढाकारातून www.kurdaipapad.com ही वेबसाईट सुरू झालीय. 

पारंपरिक पण हटके... 

जमाना फास्ट फूडचा असला तरीही पारंपारिक वाळवणाचे पदार्थ आजही जेवणाच्या ताटातलं आपलं महत्त्व टिकवून आहेत. त्यामुळे या पदार्थांना चांगली मागणी आहे. आणि कुरडई-पापड डॉट कॉमला प्रतिसादही चांगला मिळतोय. या वेबसाईटवरुन कुरडई, नागली पापड, तांदूळ, ज्वारी, तांदूळाचे पापड, वडे, वेफर्स, शेवया यासारख्या  पदार्थांची विक्री केली जाते. ग्राहकानं ऑनलाईन ऑर्डर फॉर्म भरल्यावर त्याला  वाळवणांचे पदार्थ घरपोच आणि मोफत पाठवले जातात. 

पारंपारिक पदार्थांना ऑनलाईन विक्रीची जोड दिल्यानं ग्राहकांनाही घरबसल्या हे पदार्थ उपलब्ध होणार आहेत. तर या व्यवसायामुळे शेकडो महिलांनाही रोजगार मिळालाय.