संजय पवार, सोलापूर : दारुची बाटली आडवी करण्यासाठी मतदान घ्यायचं, ठराव पास करायचे... आणखी काय काय युक्त्या करायच्या. पण हमखास यशाची खात्री नाहीच. उपळवाटेच्या महिलांची शक्कल मात्र शंभर टक्के यशाची खात्री देणार अशीच आहे.
राज्यात ठिकठिकाणी दारुबंदीसाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या जातात. पण याला नेहमीच यश येतं असं नाही.. सोलापूर जिल्ह्यातल्या माढामध्ये उपळवाटेच्या महिलांनी मात्र दारुची बाटली गावातून हद्दपार व्हावी यासाठी भन्नाट शक्कल लढवलीय. कायद्याला धाब्यावर बसवणा-या दारु विक्रेत्यांना उपळवाटेच्या मर्दानी महिलांना जोरदार दणका दिलाय. गावात जो दारू विकेल त्याच्या हातात बांगड्या भरण्याचा निर्धार महिलांनी केलाय. त्यामुळं दारू विक्रेते चांगलेच धास्तावले आहेत.
महिलांचा हा रुद्रावतार पाहुन दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणलेयत. थातूरमातूर कारवाईमुळं दारू विक्रेत्यांमध्ये पोलिसांची जरब राहिलेली नाही. उपळवाटेच्या महिलांचं हे धाडसी पाऊल कौतुकास्पद असलं तरी पोलिसांची निष्क्रीयताच यामुळं वेशीवर टांगली गेलीय.