मालवण नगरपालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार ?

मालवण शहरात नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. ग्रामदैवत श्री देव रामेश्वराला साकडं घालून शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं प्रचाराचा शुभारंभ केलाय...

Updated: Nov 7, 2016, 08:52 PM IST
मालवण नगरपालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार ? title=

विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग : मालवण शहरात नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. ग्रामदैवत श्री देव रामेश्वराला साकडं घालून शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं प्रचाराचा शुभारंभ केलाय...

मालवण... काँग्रेस नेते नारायण राणेंचा बालेकिल्ला... त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष्य या नगरपालिकेकडे लागलंय... लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राणे पिता-पुत्रांचा पराभव झाल्यानंतर मालवणात होणारी ही पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे...मालवणात वर्चस्व निर्माण करण्यासाठी राणेंनी चांगलीच कंबर कसलीय तर त्यांना रोखण्यासाठी युती सज्ज झालीय.

मालवण नगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असून काँग्रेस 15 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. युतीमध्ये शिवसेना 9 आणि भाजप 8 जागेवर निवडणूक लढवतेय. 

1990 मध्ये नारायण राणेंनी पहिला विजय मिळवला...त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत मालवणवासियांनी त्यांच्या पदरात अगदी भरभरून मतं टाकली...मात्र अलीकडे मतदारराजा राणेंवर रुसल्याचं पहायला मिळालं. गेल्या दोन वर्षांत राजकारणाच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. तेव्हा या निवडणुकीत कोण बाजी मारतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. युतीसमोर राणेंचं आव्हान नसल्याचं शिवसेना-भाजपचे नेते सांगतायत. 

         
शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांना निवडणुकीत बंडखोरीचा फटका बसलाय... सोबतच शिवसेना आमदार वैभव नाईकांची निष्क्रियता आपल्या पथ्यावरच पडेल असं काँग्रेस नेते सांगतायत.

मालवणात काँग्रेस, शिवसेना आणि भाजपला कमी अधिक प्रमाणात बंडखोरीचा फटका बसलाय. आता येत्या 28 नोव्हेंबरला मालवणी मतदारराजा कुणाच्या बाजूनं कौल देतो, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.