पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सकाळी अपघात झाला, यामुळे वाहतूक खोळंबली, ती आठ तासानंतरही अजून पूर्ववत होताना दिसत नाहीय, तरी ती लवकरच पूर्ववत होईल असं म्हटलं जात आहे.
खंडाळ्याजवळ आज सकाळी साडेसहाच्या सुमारासतेलाचा टँकर उलटला, यामुळे दोन्ही बाजूच्या मार्गावर तेल पसरले होते. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळविण्यात आली होती. यानंतर टँकरला रस्त्यावरून बाजुला करण्यात आले. आतापर्यंत मुंबईच्या दिशेने येणारी एक आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही मार्गिकांवरची वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
मात्र, अद्यापही वाहतुकीचा वेग अत्यंत धीमा असून ती पूर्ववत होण्यास आणखी काही वेळ जाईल जाईल, असे सांगण्यात येत आहे. आज सकाळी झालेल्या अपघातामुळे या मार्गावरील दोन्ही दिशेची वाहतूक तब्बल २ तास पूर्णपणे ठप्प होती. तेलाचा टँकर उलटल्याने महामार्गावर तेल पसरले.
खोपोली आणि लोणावळा परिसरात १७ ते १८ किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांची रीघ लागली होती. आठवड्यातील सुट्टीचे दिवस असल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर वाहनांची अधिक गर्दी असते, त्यातच वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बातमीत देण्यात आलेला फोटो पंकजा मुंडे यांनी आज सकाळी ट्वीट केला आहे.