सातारा : एक कार तब्बल ७०० फूट खोल दरीत कोसळली, मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे, कारमधून २८ तासानंतर चौघांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले. या अपघातात चौघांना वाचवण्यात यश मिळाले असले तरी, पती-पत्नी दोघांचा जागीच मृत्यू झाला.
पुणे-महाबळेश्वर मार्गावर पोलादपूर घाटामध्ये शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास एक कार दरीत कोसळली होती. या दरीतून चौघांना जिवंत बाहेर काढण्यात महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुपने अथक प्रयत्न केले. अपघातग्रस्त गाडीतील सर्व रहिवासी बंगळुरुचे आहेत.
महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुपमधील एकाला मोबाईलवर या अपघाताची माहिती देणारा संदेश मिळाला, यानंतर ट्रेकर्स ग्रुपने प्रयत्न सुरु केले होते. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास चौघांना जिवंत बाहेर काढण्यात आले.
जमुना खन्ना बिरानी आणि वेणूगोपाल स्वामी खन्ना बिरानी अशी मृतांची नावे आहेत. पोलादपूर घाटातील बिरवाडी गावाजवळ हा अपघात झाला. जखमींना पोलादपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.