पुण्यातील कचरा प्रश्नाची कोंडी कायम, राज्यमंत्री शिवतारेंचा प्रयत्न अयशस्वी

पालकमंत्री तसेच महापौरांच्या अनुपस्थितीत राज्यमंत्री विजय शिवतारेंनी आज पुण्यातील कचरा कोंडी फोडण्यासाठी पुढाकार घेतला. ठरलेल्या मुदतीत कचरा डेपोचा प्रश्न सुटला नाही तर थेट राजीनामा देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. मात्र त्याउपरही आंदोलनकर्ते ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. स्वतःच्या तोंडावर पट्टया बांधून त्यांनी माघारीचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 6, 2017, 06:51 PM IST
पुण्यातील कचरा प्रश्नाची कोंडी कायम, राज्यमंत्री शिवतारेंचा प्रयत्न अयशस्वी  title=

अरूण मेहेत्रे, पुणे : पालकमंत्री तसेच महापौरांच्या अनुपस्थितीत राज्यमंत्री विजय शिवतारेंनी आज पुण्यातील कचरा कोंडी फोडण्यासाठी पुढाकार घेतला. ठरलेल्या मुदतीत कचरा डेपोचा प्रश्न सुटला नाही तर थेट राजीनामा देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. मात्र त्याउपरही आंदोलनकर्ते ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. स्वतःच्या तोंडावर पट्टया बांधून त्यांनी माघारीचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.

मंत्रीमहोदय चर्चेसाठी येण्याच्या आधीपासूनच ग्रामस्थांनी मौन धारण केलं  होतं. तोंडावर काळ्या फिती बांधून त्यांनी 'आता चर्चा नको निर्णय हवा' असा पवित्रा घेतला होता. असं असताना राज्यमंत्री विजय शिवतारे आंदोलनस्थळी दाखल झाले. कचरा डेपोच्या विषयात मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं असल्याचा दावा त्यांनी केला. कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक्शन प्लॅन निश्तिच करण्याचं आवाहन त्यांनी केलं. आणि या एक्शन प्लॅनची अमंलबजावणी झाली नाही तर राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली. 

विजय शिवतारे हे पुरंदरचे आमदार आहेत. कचरा डेपोचा प्रश्न त्यांच्या मतदारसंघातील आहे. हा डेपो कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी त्यांनी स्वतः याआधी आंदोलनं केलेली आहेत. आज मात्र त्यांची भूमिका काहीशी बदललीय. अर्थात इतर राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांची अवस्था वेगळी नाहीए. अशावेळी शिवतारेंचा ग्रामस्थांशी संवाद तसा एकतर्फीच ठरला. त्यामुळे ग्रामस्थांना बैठकीला येण्याचं आवाहन करताच काहींच्या तोंडावरील पट्ट्या आपसूक खाली उतरल्या. 

पुण्यातील कचरा प्रश्नाचं राजकारण करू नका असं सगळेच सांगतात. मात्र ते टळत नाही हेदेखील खरं आहे. पालकमंत्री गिरीश बापट तसेच महापौर मुक्ता टिळक परदेश दौऱ्यावर आहेत. त्यांच्याबद्दल पुणेकरांमध्ये नाराजी आहे. अशावेळी शिवसेनेचे विजय शिवतारे सक्रिय झाले आहेत. मात्र त्यांच्याकडूनही हा विषय कितपत पुढे जाईल याबद्दल साशंकता आहे. 

कचरा डेपोसंदर्भात कुठलीही चर्चा करण्यास ग्रामस्थांनी साफ नकार दिलाय. मागील गुरुवारी त्यांनी कचरा डेपोचा अंत्यविधी केला. त्याचा दशक्रिया विधी होईपर्यंत म्हणजे १२ तारखेपर्यंत त्यांचं मौन सुरु असणार आहे. दरम्यान या सगळ्यामध्ये पुण्यातील कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न कायम आहे.