औरंगाबाद : मी दुष्काळी दौऱ्यावर आलेलो नाही. हा माझा दोन दिवसांचा दौरा आहे. मी कार्यकर्त्यांचे काम पाहायला आलोय, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेय.
राज ठाकरे हे दुष्काळ भागातील पाच जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असल्याचे सांगितले जात होते. मात्र, राज ठाकरे यांनी दुष्काळ भागाचा धावता दौरा का केला, त्यांना या दौऱ्यात काय साधायचे होते, अशा बातम्या आल्यानंतर चर्चा होऊ लागली. या चर्चेला आता पूर्णविराम लागलाय. कारण राज ठाकरे यांनी हा माझा दोन दिवसांचा दौरा होता, मी दुष्काळ भागातील दौऱ्यावर नाही, असे सांगितले.
भीषण दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या लातूरचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धावता दौरा केला. मात्र या दौऱ्यातून त्यांना लातूरचा दुष्काळ कितपत समजला हा चिंतनाचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
मोठा गाजा-वाजा करून मनसे प्रमुख राज ठाकरे आज दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यासाठी दोन दिवसांपूर्वी सकाळी लातूर स्थानकावर दाखल झाले. यावेळी स्थानकावर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर लातूरच्या शासकीय विश्रामगृहावर त्यांनी ३० हजार लिटरच्या १८ पाण्याच्या टाक्यांचे वितरण केले होते.