स्त्री बिजांची विक्री करणाऱ्या टोळीने केली महिलेची हत्या

सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. तीन महिलांच्या एका टोळीने आधी एका नवजात बालकाच्या आईचा खून केला त्यानंतर या महिलांनी बाळाला चक्क चार लाखांत विकण्याचा घाट घातला... पण, त्यांचा हा डाव मात्र फसला.  

Updated: Jun 22, 2016, 06:49 PM IST
स्त्री बिजांची विक्री करणाऱ्या टोळीने केली महिलेची हत्या title=

पुणे : सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. तीन महिलांच्या एका टोळीने आधी एका नवजात बालकाच्या आईचा खून केला त्यानंतर या महिलांनी बाळाला चक्क चार लाखांत विकण्याचा घाट घातला... पण, त्यांचा हा डाव मात्र फसला.  

निकीता कांगणे, लक्ष्मी जाधव, चंद्रभागा उडांशू, आकाश उडांशू या चार जणांच्या टोळीने या बाळाच्या जन्मानंतर आईचा खून केला आणि बाळाचे अपहरण केलं. या टोळीतील निकीता कांगणे ही या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे.

महत्त्वाचं म्हणजे या बाळाच्या विक्रीच्या उद्देशानेच या महिलांनी बाळाच्या आईची हत्या केलीय. या संदर्भात तिचे पुण्यात सातारा रोडवरील एका व्यक्तीशी बोलणे झाले होते. ती व्यक्ती हे बाळ चार लाखांत खरेदी करण्यासाठी तयार होती. पोलीस आता त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

कोण आहे ही निकीता कांगणे?

निकीता ही रामटेकडी झोपडपट्टीत राहते. ती एकदा सरोगेट मदर झाली होती. त्यातून तिला पैसे कमावण्याचा अनोखा मार्ग गवसला. पैसे कमावण्याचे आमीष दाखवून ती आसपासच्या महिलांना जाळ्यात अडकवायची. त्यांचे स्त्रीबीज विकण्याची सवय या महिलांना तिने लावली. सरोगसीत स्त्रीबीजाच्या विक्रीतून १५ हजार रूपये मिळायचे. त्यातील १० हजार रूपये संबंधित महिलेला देऊन ५ हजार रूपये निकीता स्वतःकडे ठेवायची.

निकीता या गोरख धंद्यातील दलाल आहे. तिच्याकडे इतके पैसे येतात कुठून? हा प्रश्न परिसरातल्या लोकांना पडायचा. पण तिच्या दहशतीमुळे आजवर कशाचाच उलगडा होऊ शकला नव्हता.