जळगाव : जे अमळनेर शहर साने गुरूजींची कर्मभूमी म्हणून ओळखलं जातं, त्याच साने गुरूजींनी 'खरा तो एकची धर्म लिहलं', मात्र दुर्देवाने याच शहरातील संस्थाचालकांनी 'घरा' तो एकची धर्म कारनामे सुरू केले आहेत.
खानदेश शिक्षण मंडळाच्या काही संचालकांनी 'घरा'तील प्राध्यापकाला वाचवण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या मनात 'खरा' अशी प्रतिमा असलेल्या आणि चोरी प्रकरणात कारवाईची मागणी करणाऱ्या प्राचार्यालाच पदावरून हटवलंय.
काय आहे चोरीचं प्रकरण?
संस्थेतील एका संचालकाच्या मुलावर कॉलेजचं क्रीडा साहित्य चोरीचा आरोप आहे, म्हणून प्राचार्य एल ए पाटील यांनी निलंबनाची मागणी केली होती, मात्र एल ए पाटलांनाच प्राचार्य पदावरून हटवून, चोर सोडून सन्याशाला फाशी, असा नवा पायंडा सध्या अमळनेरात सुरू आहे.
जिल्ह्यातील अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये सध्या अंसतोष खदखदतोय. कारण शिस्तप्रिय प्राचार्य डॉ. एल.ए.पाटील यांना प्राचार्य पदावरून संस्थेन हटवलंय.
एल.ए.पाटील यांना पुन्हा प्राचार्य पदावर घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून आंदोलन छेडलं आहे. सुरूवातीला विद्यार्थ्यांनी कॉलेज बंद ठेऊन या घटनेचा निषेध केला. तर आज भर पावसात साने गुरूजींची 'खरा तो एकची धर्म' ही कविता म्हणून या घटनेचा निषेध केला.
एल.ए.पाटलांची चूक काय? साने गुरूजींच्या अमळनेरात नैतिकतेची हत्या?
खानदेश शिक्षण मंडळाचं प्रताप महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात संस्था चालकाचा मुलगा ज्यूनियर कॉलेजात क्रीडा शिक्षक म्हणून काम पाहत होता. या शिक्षकावर क्रीडा साहित्य चोरीचा आरोप आहे.
क्रीडा साहित्य चोरीच्या प्रकरणावर प्राचार्य़ एल.ए.पाटील यांच्याशिवाय कुणीही जाहीरपणे बोलत नव्हतं. एल.ए.पाटील यांनी या प्रकरणात निलंबनाची मागणी केली होती. यामुळे संस्थेला इच्छा नसतांनाही प्राध्यापकाला नाईलाजाने निलंबित करावं लागलं असल्याची चर्चा आहे.
साने गुरूजीही हळहळले असतील
क्रीडा साहित्य प्रकऱणात संस्था चालकाच्या मुलाचं निलंबन प्राचार्य एल. ए. पाटील यांच्यामुळे करावं लागलं, यावरून एल.ए.पाटील यांना पदावरून हटवण्यात आल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे प्राचार्य पदावरून संस्थेनं एल ए पाटील यांना हटवलं, कारण संचालकांशी उलट आणि बेलगाम बोलले, असं सांगून एल. ए. पाटील यांना प्राचार्य़ पदावरून हटवलं आहे. तसेच शिक्षण मंडळाने यावर प्रतिक्रिया देतांना म्हटलंय, प्राध्यापकाच्या निलंबनाचा मुद्यावरून, एल. ए. पाटील यांना प्राचार्यपदावरून हटवण्यात आलेलं नाही.
मात्र खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक आणि माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी या विषयावर संचालक मंडळाच्या बैठकीत कोणतीही चर्चा न करता एल. ए. पाटील यांना प्राचार्य पदावरून हटवण्यात आलं असल्याचं म्हटलं आहे.
पदावरून हटवल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांकडून कॉलेज बंद
एल.ए.पाटील यांना प्राचार्य पदावरून हटवल्याची बातमी आल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रताप महाविद्यालयात जोरदार घोषणाबाजी केली आणि संस्थेच्या या अन्यायकारक कारवाईविरोधात पहिल्या दिवशी कॉलेज बंद ठेवलं आहे.
विद्यार्थ्यांनी आज भर पावसात साने गुरूजींच्या पुतळ्यासमोर 'खरा तो एकची धर्म' प्रार्थना म्हणून आंदोलनाला सुरूवात केली आहे. साने गुरूजींच्या अमळनेरात या विषयाची जोरदार चर्चा असली, तरी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला अमळनेरकरांची साथ महत्वाची ठरणार आहे.
सोशल मीडियावर या घटनेचं वास्तव मांडण्यासाठी https://www.facebook.com/pratapiyans हे पेज सुरू करण्यात आलं आहे. पेजला लाईक करणाऱ्यांची संख्या वाढतेय, यावर अमळनेरकरांना विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे अपडेट मिळत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.