स्टींग ऑपरेशन : कागल आरटीओ अधिकाऱ्यांच्या लाचखोरीचा पर्दाफाश

कोल्हापूर जिल्हयातल्या कागल प्रादेशिक परिवहन विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावर वाहन चालकांची खुलेआम लूट केली जातेय. ही माहिती मिळाल्यानंतर ‘झी मीडिया’ची टीम तिथं पोहोचली.  

Updated: Jul 18, 2014, 09:12 PM IST
स्टींग ऑपरेशन : कागल आरटीओ अधिकाऱ्यांच्या लाचखोरीचा पर्दाफाश title=

कोल्हापूर (प्रताप नाईक, प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हयातल्या कागल प्रादेशिक परिवहन विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावर वाहन चालकांची खुलेआम लूट केली जातेय. ही माहिती मिळाल्यानंतर ‘झी मीडिया’ची टीम तिथं पोहोचली. तेव्हा चक्क आमच्या प्रतिनिधींनाच आमीष दाखवण्यात आलं... हा सगळा प्रकार झी मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. 
  
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल सीमा तपासणी नाका हा नेहमीच चर्चेत राहिलाय. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील या नाक्यावर आरटीओकडून वाहनांची तपासणी केली जाते. पण, ज्यावेळी ‘झी मीडिया’ची टिम तिथं पोहचली तेव्हा मात्र इथलं चित्र वेगळंच होतं. या नाक्यावरुन जाणारा प्रत्येक वाहनचालक आरटीओ कर्मचारी आणि आधिकाऱ्यांकडे वाहनाची कागदपत्रं घेऊन जाण्याऐवजी फक्त पैसे घेऊन जात होता. या नाक्यावर माल वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून खुलेआम पैसे घेतले जातात. ‘झी मीडिया’ची टिम हे सगळं दृष्य टिपत होती. 

पुणे – बंगळुरू महामार्गाच्या पूर्वेकडील बाजूस असणाऱ्या सीमा तपासणी नाक्यावरील ऑफीसमध्ये आम्ही गेलो तर तिथले इन्स्पेक्टर आशीष पराशर हे ड्युटीवर असताना पुण्याला गेल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. आमची टीम शूट करतेय, हे कळल्यानंतर इथले पंटर पसार झाले. त्यानंतर कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या सीमा तपासणी नाक्यावर बसलेले इन्स्पेक्टर श्रीनिवास जल्लावर तिथं आले. त्यांनी आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांना आमीष दाखवण्याचाही प्रयत्न केला. अनेक वर्षांपासून अशाप्रकारे याठिकाणी पैसे उकळले जात असल्याचंही आरटीओ इन्स्पेक्टर श्रीनिवास जल्लावर यांनी यावेळी बोलताना म्हटलंय. एव्हढंच नव्हे तर आपण चोख ड्युटी बजावतो आणि शासनाचं टार्गेट कसं पूर्ण करतोय, अशी शेखीही त्यांनी मारली... हा सगळा प्रकार आमच्यात कॅमेऱ्यात कैद झालाय.

कागल सीमा तपासणी नाक्यावरुन दररोज हजारो गाड्या ये-जा करतात. शासनानं दिलेल्या टार्गेटपेक्षा कितीतरी पटीनं या ठिकाणी दंड वसुली होते. टार्गेटएवढे पैसे वसूल झाले की उर्वरित पैसा अधिकारी थेट स्वतःच्या खिशात टाकतात. ‘झी मीडिया’च्या स्टींग ऑपरेशननंतर हे स्पष्ट झालंय. कागलच्या या नाक्यावर नेमणूक व्हावी यासाठी अनेक अधिकारी प्रयत्नशील का असतात, त्याचं उत्तर आता कळतंय. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आता परिवहनमंत्री काय कारवाई करणार? भ्रष्टाचाराची ही कुरणे बंद होणार की नाहीत...?

ही बातमी दाखवून केवळ एखाद्या अधिकाऱ्याची बदनामी व्हावी किंवा त्यांची नोकरी जावी हा आमचा उद्देश नाही... पण जो भ्रष्टाचार चालतो, तो दाखवणं हे ‘झी मीडिया’चं कर्तव्य आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.