मुंबई : "स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच". लोकमान्य टिळक यांच्या या घोषणेला यंदा 100 वर्ष पूर्ण होत आहेत. 2016 हे वर्ष लोकमान्य टिळक यांचं 160 वे जयंती वर्ष आहे, तसंच पुढच्या वर्षी टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 वर्ष पूर्ण होत आहेत.
महाराष्ट्र शासनानं 2016 आणि 2017 या वर्षी लोकमान्य उत्सव आणि लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान साजरं करण्याचा निर्णय घेतला आहे. 5 सप्टेंबर म्हणजेच गणेश चतुर्थीपासून या अभियानाला सुरुवात होणार आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंनी ही माहिती दिली आहे. 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरपर्यंत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा भाग म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा गौरव करण्यात येणार आहे. देखावे, समाजकार्य, गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत याचं मूल्यांकन करून मंडळांना पुरस्कार देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत भाग घेण्याकरिता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेल्या स्वदेशी, साक्षरता, बेटी-बचाव, व्यसनमुक्ती आणि जलसंवर्धन यापैकी एका कल्पनेशी निगडीत देखावा करणे आवश्यक आहे. या शासन स्पर्धेत सहभागी होण्याकरिता राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शासनाने विहित केलेल्या अर्जामध्येच संबंधित तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा लागणार आहे.
गणेशोत्सव मंडळ स्पर्धांमधल्या विजेत्यांना मिळणार एवढी रक्कम
विभागीय स्तर
प्रथम विजेते- 2,00,000
द्वितीय विजेते- 1,50,000
तृतीय विजेते- 1,00,000
जिल्हा स्तर
प्रथम विजेते- 1,00,000
द्वितीय विजेते- 75,000
तृतीय विजेते- 50,000
तालुका स्तर
प्रथम विजेते- 25,000
द्वितीय विजेते- 15,000
तृतीय विजेते- 10,000