मुंबई : अभिनेता रितेश देशमुख निर्मित 'यलो' या सिनेमातून आपल्या अभिनयानं सगळ्यांची मनं जिंकण्यापासून राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत बाजी मारणाऱ्या गौरी गाडगीळनं आता शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.
'स्पेशल चाईल्ड' गौरी आता पदवीधर झाली आहे. तिनं कला आणि समाजशास्त्र या विषयात पदवी मिळवली आहे. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी 'आमची गौरी आता पदवीधर झालीय' अशी फेसबूक पोस्ट टाकून, गौरीचं अभिनंदन केलंय.
या पोस्टनंतर गौरी गाडगीळवर, सोशल मिडियावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. महेश लिमये दिग्दर्शित, रितेश देशमुख निर्मीत, यलो या सिनेमात अभिनेत्री गौरी गाडगीळनं दमदार भूमिका साकारली होती. या सिनेमातल्या तिच्या कामगिरीसाठी गौरीला स्पेशल ज्यूरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
गौरी गाडगीळ ही एक उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेच, पण त्याच बरोबर ती एक उत्तम खेळीडूही आहे. आंतराष्ट्रीय स्तरावरही गौरीनं आपलं कौशल्य सिद्धकरुन दाखवलंय. आंतराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम जलतरणपटू गौरी गाडगीळनं बिजिंग पॅरालिम्पिकमध्ये भारताचे नेतृत्व करत, रोप्यपदक पटकावले होतं.