मुंबई : आगामी नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुका भाजप-शिवसेनेनं एकसाथ लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
याआधी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची सविस्तर चर्चा झाली. या चर्चेबद्दल खासदार विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरेंना माहिती दिली. यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केली.
नगर पालिकांसाठी युती झाली असली तरी महापालिका निवडणुकांबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचं दोन्ही पक्षांनी स्पष्ट केलं आहे. मात्र पुढल्या वर्षी मुंबईसह 10 महापालिका निवडणुकांमध्ये युतीच्या दृष्टीनं पुढचं पाऊल पडल्याचं मानलं जात आहे.