मोबाईल रिंगटोनचं निमित्त... आणि जातीयवादातून आणखी एक हत्या

शिर्डीतील सागर शेजवळ या तरुणाच्या निर्घृण हत्येनं वेगळं वळण घेतलंय. ही हत्या जातीयवादातून आणि मोबाईलच्या रिंगटोनवरुन झाल्याचं उघडकीस आलंय.

Updated: May 23, 2015, 09:49 AM IST


सागर शेजवळ

शिर्डी : शिर्डीतील सागर शेजवळ या तरुणाच्या निर्घृण हत्येनं वेगळं वळण घेतलंय. ही हत्या जातीयवादातून आणि मोबाईलच्या रिंगटोनवरुन झाल्याचं उघडकीस आलंय.

बियर शॉपमध्ये बसलेल्या सागरच्या मोबाईलची रिंगटोन वाजल्यानं रागाच्या भरात विशाल कोते आणि त्याच्या साथीदारांनी त्याची हत्या केल्याचं सांगितलं जातंय. एका लग्नाच्या निमित्तानं शिर्डीत दाखल झालेल्या सागरनं आपल्या मोबाईलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील एका गाण्याची रिंगटोन लावली होती. सागरच्या फोनवर एक फोन आल्यानं ही रिंगटोन वाजली. त्यामुळे, सागरच्या मागच्याच टेबलवर बसलेल्या एका टोळक्यानं अचानक सागरच्या डोक्यात बिअरची बाटली फेकून मारली... त्यानंतर जवळच्याच जंगलात नेऊन त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.... कोतेनं प्रथम सागरला बेदम मारलं त्यानंतर त्याला फरपटत शिंगवे परिसरात नेलं आणि तिथं दगडाला ठेचून त्याची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. 

पोलिसांनी सागरचा शोध घेतल्यानंतर त्यांना सागरचा मृतदेह नग्नावस्थेत जवळच्याच एका गावात सापडला होता. या हत्येंनंतर विशाल खोते, सोमनाथ वाडेकर, रुपेश वाडेकर आणि सुनिल जाधव  या आरोपींना तातडीनं पकडण्यात आलं. 

ज्या दुकानात सागर बसला होता तिथलं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलंय. यामध्ये आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत.

अनपेक्षित अशा या घटनेमुळे हादरलेल्या सागरच्या आईवडिलांनी या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केलीय.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.