शेतमजूर ते महापौर : शकुंतला धऱ्हाडेंचा प्रवास

पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला धऱ्हाडे यांचा शेतमजूर ते महापौर हा प्रवास संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे... पण, आता हा संघर्ष आणखी कठीण झालाय. कारण एकेकाळी राष्ट्रवादीत असलेले आणि शकुंतला धऱ्हाडे यांना भक्कम पाठिंबा असलेले लक्ष्मण जगताप आता भाजपमध्ये आहेत... आणि आता जगतापांच्या बालेकिल्ल्यातूनच धऱ्हाडे निवडणूक लढवत आहेत.

Updated: Feb 8, 2017, 01:47 PM IST
शेतमजूर ते महापौर : शकुंतला धऱ्हाडेंचा प्रवास title=

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला धऱ्हाडे यांचा शेतमजूर ते महापौर हा प्रवास संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे... पण, आता हा संघर्ष आणखी कठीण झालाय. कारण एकेकाळी राष्ट्रवादीत असलेले आणि शकुंतला धऱ्हाडे यांना भक्कम पाठिंबा असलेले लक्ष्मण जगताप आता भाजपमध्ये आहेत... आणि आता जगतापांच्या बालेकिल्ल्यातूनच धऱ्हाडे निवडणूक लढवत आहेत.

वडापाव विकता विकता...

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात १० पर्यंत शिक्षण घेतलेल्या शकुंतला धऱ्हाडे यांच्या पतीला पिंपरी चिंचवडमध्ये नोकरी लागली आणि शकुंतला धऱ्हाडे पिंपरी चिंचवडमध्ये राहण्यासाठी आल्या. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे पतीला मदत देण्याच्या हेतून शकुंतला धऱ्हाडे यांनी शेतमजुरीचं काम सुरु केलं. त्यानंतर त्यांनी बचत गटात सहभागी होत आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा प्रयत्न केला.

बचत गटामध्ये असताना वडापाव, इडली विकण्याच काम त्यांनी केलं. बचत गटाचं त्यांचं काम एवढं प्रभावी ठरलं की असंख्य महिलांशी, त्यांच्या कुटुंबियांशी शकुंतला धरहाडे यांचा संपर्क वाढला. त्यांचं हे काम राजकीय पक्षांच्या नजरेत भरलं नसत तर नवलच…

महापौरपदाची संधी

२००७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसन त्यांना महापालिके साठी उमेदवारी दिली… ती ही त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी नाही तर शेजारच्या वार्डात… विशेष म्हणजे त्यावेळी शकुंतला धऱ्हाडे बिनविरोध निवडून आल्या… अर्थात त्याला राष्ट्रवादी काँग्रेसची शहरात असलेली ताकत ही कारणीभूत होती…

२०१२ साली ही राष्ट्रवादी काँग्रेसन पिंपळे गूरवमधून उमेदवारी दिली आणि सलग दुसऱ्या वेळी बिनविरोध जिंकण्याचा पराक्रम त्यांनी केला. 2014 मध्ये महापौर पद अनुसूचित जमातीसाठी राखीव झालं आणि शकुंतला धऱ्हाडे यांना थेट महापौर पदाची संधी मिळाली…

जगताप यांच्याशी सामना...

आता त्या निवडणुकीच्या रिंगणात तिसऱ्यांदा उतरत आहेत, पण त्यांचा संघर्ष आता कठीण झालाय. आत्तापर्यंत महापौर बिनविरोध निवडून आल्या असल्या तरी त्यांना लक्ष्मण जगताप यांचा पाठिंबा होता. त्या बिनविरोध निवडून येण्याचे कारणच जगताप होते. पण आता लक्ष्मण जगताप भाजप अध्यक्ष आहेत आणि महापौर राष्ट्रवादीत पर्यायाने जगताप यांच्या विरोधात...!

त्यामुळं निवडून येण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे...जगताप यांच्या बालेकिल्ल्यातच त्या उभ्या असल्याने त्यांचं आव्हान आणखी कठीण झालं आहे..! पण केलेल्या कामाच्या जोरावर विजयी होऊ असा विश्वास त्या व्यक्त कारत आहेत.