मुंबापुरीत नव्याने सापडल्या सात पुरातन गुंफा

मुंबई : कान्हेरी लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सहा नवीन लेण्यांचा शोध लागला आहे.

Updated: Jan 18, 2016, 04:22 PM IST
मुंबापुरीत नव्याने सापडल्या सात पुरातन गुंफा  title=
फोटो प्रातिनिधीक

मुंबई : कान्हेरी लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सात नवीन लेण्यांचा शोध लागला आहे. उद्यानाच्या ईशान्य भागात असलेल्या या प्राचीन लेण्या कान्हेरीपेक्षाही पुरातन असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे. 

या लेण्या बौद्धकालीन असून त्या बौद्ध भिक्खूंच्या आश्रयासाठी बांधल्या गेल्या असाव्यात, असा संशोधकांचा कयास आहे. अशा प्रकारच्या लेण्यांना 'विहार' असेही संबोधले जाते. 

मुंबई विद्यापीठाचा पुरातत्व विभाग आणि साठ्ये कॉलेजचा भारतीय संस्कृती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे संशोधन करण्यात आले. या टीमचं नेतृत्व विभाग प्रमुख सूरज पंडित यांनी केलं. 

पंडितांच्या मते या गुहा कान्हेरीपेक्षा साध्या आहेत. त्यात जलव्यस्थापनाची व्यवस्थाही फारशी नाही. त्यामुळेच त्या कान्हेरीपेक्षाही पुरातन असल्याच्या संशयाला पुष्टी मिळते. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात वापरली जाणारी काही अखंड हत्यारेही येथे सापडली आहेत. पावसाळ्याच्या काळात बौद्ध भिक्खूंच्या निवासासाठी त्या वापरल्या जात असाव्यात असा अंदाज आहे. 

गेल्या फेब्रुवारी महिन्यात हे संशोधन झाले असून भारतीय पुरातत्व शास्त्र विभागाला याविषयी माहिती दिली गेली आहे. यासंबंधी पुढील संशोधन सुरू आहे.