गडचिरोली : चार्मौशी येथे राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा होता. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी विदर्भवादी महिला कल्पना मस्की हिने अजित पवार यांच्या दिशेने चप्पल भिरकावली. दरम्यान, अजित पवार यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
निर्धार मेळाव्यात राजुरा येथील कल्पना मस्की या विदर्भवादी महिलेने अजित पवार यांच्यावर चप्पल भिरकावल्याने खळबळ माजली. पोलिसांनी या महिलेस लगेच ताब्यात घेतले. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आर. आर. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस सुरेश सावकार पोरेड्डीवार आदी उपस्थित होते.
अजित पवार मंचावरून खाली उतरत असतानाच लोकांमध्ये उपस्थित असलेल्या कल्पना मस्की या विदर्भवादी महिलेने जय विदर्भ, विदर्भ राज्य झालेच पाहिजे, अशा घोषणा देत अजित पवारांच्या दिशेने चप्पल भिरकावली. मात्र, मस्की दूर असल्याने त्यांनी भिरकावलेली चप्पल पवारांपर्यंत न पोहचता ती गर्दीमध्ये पडली. या घटनेमुळे सभास्थळी एकच खळबळ माजली. पोलिसांनी लगेच कल्पना मस्की यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या महिलेची चौकशी सुरु केलेय.
दरम्यान चामोर्शी येथील कार्यक्रमापूर्वी अजित पवार यांनी गडचिरोली येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी स्वतंत्र विदर्भा मागणी जोर धरत असल्याबाबत पवार यांना विचारणा केली. त्यावर स्वतंत्र विदर्भाची मागणी ही जनतेची मागणी नसल्याचे सांगून त्यांनी स्वतंत्र विदर्भाला अप्रत्यक्षपणे बोलणे टाळले. दरम्यान, मतपेटीच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने, अशी मागणी आली पाहिजे, असे उत्तर अजित पवार यांनी दिले. राज्य सरकारने विदर्भाच्या विकासासाठी भरपूर निधी दिल्याचेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.