नाशिक : मालेगावच्या दुंधे, माळीनगर भागात पक्षांचा किलबिलाट कमी झाला. पण माळीनगर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांमुळे हा किलबिलाट दोनच दिवसांत वाढलाही.
मालेगावमधल्या दुंधे, माळीनगरमध्ये टँकरची सुरुवात झालीय. पक्षांचेही त्यामुळं हाल होतायत. पण माळीनगर जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी पक्षी वाचवण्यासाठी पुढाकार घेतला. घरातले रिकामे कॅन, डबे कल्पकतेने कापले आणि अन्न पाण्यासाठी भांडी तयार केली. ही भांडी झाडांवर टांगली. दोन दिवसांत शाळा परिसरात किलबिलाट वाढलेला पाहून बच्चेकंपनी आनंदुन गेलीय.
सावलीत खड्डे खणून त्यातही पाण्याची भांडी ठेवलीयत. या विद्यार्थ्यांमध्ये भूतदया, परिसर अभ्यास, वैज्ञानिक दृष्टीकोन, संवेदनशीलता. ही सारीचं मुल्य यामुळं रुजायला लागलीयत. घरीही असंच वागण्याचा आग्रह ही मुलं पालकांना करतात.
या बच्चेकंपनीचं हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आणि सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.