मुलींना चटके दिल्याने मुख्याध्यापिकेला अटक

पैसे चोरल्याचा संशयावरून आदिवासी वस्तीगृहात शिकणाऱ्या ९ वर्षाच्या मुलीला मुख्याध्यापिकेने पाठीवर चटके दिले. पनवेलमध्ये हा गंभीर प्रकार समोर आलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन मुख्याध्यापिकेला अटक झाली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 2, 2017, 11:23 PM IST
मुलींना चटके दिल्याने मुख्याध्यापिकेला अटक title=

पनवेल : पैसे चोरल्याचा संशयावरून आदिवासी वस्तीगृहात शिकणाऱ्या ९ वर्षाच्या मुलीला मुख्याध्यापिकेने पाठीवर चटके दिले. पनवेलमध्ये हा गंभीर प्रकार समोर आलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन मुख्याध्यापिकेला अटक झाली आहे.

नवीन पनवेल सुकापूर येथील भगतवाडीत मल्हार इंग्लिश स्कूलमध्ये आदिवासी मुलासाठी वसतीगृह आहे. या वसतीगृहात ३१ आदिवासी मुलं वास्तव्याला आहेत. शाळेत ५५  विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या ९ वर्षीय हर्षदा लेंडी या आदिवासी विद्यार्थिनीवर १०० रुपये  चोरीचा आरोप करत मुख्याध्यापिका सुविधा बेडदे यांनी तिला भयानक शिक्षा दिली.

 गॅसवर स्टीलचा कालथा तापवून विद्यार्थिनीच्या पाठीवर चटके दिले. १८ जानेवारी रोजी ही घटना घडली होती. ही घटना कोणालाही सांगायची नाही असा दमच मुख्यध्यापिकेने दिला होता. परंतु ३१ तारखेला जेव्हा पालक शाळेत आले. त्यावेळी विद्यार्थिनीने याघटनेची माहिती पालकांना दिली. यावेळी शाळेतील इतरही मुलांना अशा प्रकारे, अमानुष मारहाण केली जाते असा आरोप पालकांनी केला.

यावेळी इतर विद्यार्थ्यांनी देखील आपल्या सोबत झालेल्या त्रासाची माहिती दिली.पालकांनी खांदेश्वर पोलिस ठाणे गाठत मुख्याध्यापिके विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांन्नी तत्काळ कारवाई करत मुख्याध्यापिकेला अटक केली.

दरम्यान शाळेच्या संस्था अध्यक्षांनी  अजब तर्क लावत मुख्याध्यापिकेचा बचाव केलाय. विद्यार्थिनीला झालेली जखम ही इन्फेक्शन मुळे झालीये. शाळेला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची सारवासारव केली. या शाळेतील प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्यामागे आदिवासी विभाग वर्षाला 50 हजार रुपये देते. मात्र शिक्षकच विद्यार्थ्यांना अशी अमानुष वागणूक देत असतील तर या मुलांची शिक्षणाची वाट आणखी बिकट होईल.