सातारा : संतोष पोळने केलेल्या आणखी काही खुनांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. आणखी महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी केलेल्या चौकशीत संतोष पोळने वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये मदत केलेल्या साथीदारांची नावे उघड केली आहेत. त्यामुळे वाईतल्या अनेकांचं बिंग फुटणार आहे.
संतोष पोळच्या घराजवळ पोलिसांनी केलेल्या उत्खननात वनिता गायकवाडचा सांगाडा सापडलाय. संतोष पोळ याने केलेल्या हत्याकांडात 5 मृतदेहांचे सांगाडे आधीच हस्तगत करण्यात आले होते. पण वनिता गायकवाड यांचा मृतदेह आपण धोम धरणात फेकल्याचे पोळ याने याआधी सांगितलं होतं. पण आता जबाब बदलत बरोबर दहा वर्षांपूर्वी रक्षाबंधनाच्या दिवशीच वनिताला धोम धरणाच्या भिंतीवर लोखंडी गजाने मारून तिचा मृतदेह पुरल्याची कबुली पोळनं दिली. त्यानंतर त्याच्या घराजवळ केलेल्या उत्खननात वनिता गायकवाड यांचा सांगाडा सापडला.
वनिता गायकवाड या संतोष पोळकडे किरकोळ आजाराच्या तपासणीसाठी गेल्या होत्या. मात्र, परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्याने एड्स असल्याचे सांगून त्यांना वेगवेगळी औषधे दिली आणि कायम भीतीच्या छायेखाली ठेवले. वनिता गायकवाड यांचे संतोष पोळ यांच्याकडे कायम येणे-जाणे असायचे. दरम्यान, पोळने अनेकांची नावे घेतली आहेत. त्यामुळे आणखी खुनांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.