यंदा `रिंगण`मधून होणार जनाबाईंची भेट

  संतपरंपरेचा सामाजिक, सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या `रिंगण` वार्षिकाचा संत जनाबाई विशेषांक यंदा पुणे येथे प्रकाशित होणार आहे.

Updated: Jul 10, 2015, 08:27 AM IST
यंदा `रिंगण`मधून होणार जनाबाईंची भेट title=
परभणीतील गंगाखेड या जनाबाईंच्या जन्मगावी असणारी संत जनाबाईंची मूर्ती आणि रिंगणचा मागील अंक

वार्षिक `रिंगण`च्या संत जनाबाई विशेषांकाचे शनिवारी पुण्यात प्रकाशन

पुणेः संतपरंपरेचा सामाजिक, सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या `रिंगण` वार्षिकाचा संत जनाबाई विशेषांक यंदा पुणे येथे प्रकाशित होणार आहे. शनिवारी दि. ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी असणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांवर हा विशेषांक अर्पण करून त्याचे प्रकाशन होईल. प्रख्यात भारूड गायिका चंदाताई तिवाडी यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे. याप्रसंगी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे, संत साहित्याचे अभ्यासक अभय टिळक, पालखी सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ चोपदार, पालखीचे मानकरी श्रीमंत शितोळे सरकार, आळंदी येथील संत ज्ञानेश्वर मंदिराचे प्रमुख विश्वस्त शिवाजीराव मोहिते, `टेकरेल`चे भूषण कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

दिवाळीचे अंक असतात तर महाराष्ट्राचा सर्वात मोठा सोहळा असलेल्या आषाढी एकादशीचे अंकही असायला हवेत, या भूमिकेतून `रिंगण`ची सुरुवात झाली आहे. याआधी संत नामदेव आणि संत चोखामेळा यांच्यावरील विशेष अंकांना अभ्यासक आणि वारकरी दोघांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला होता. संतसाहित्यात रुची असणाऱ्यांना आता संत जनाबाई अंकाची प्रतीक्षा आहे.

एक संत आणि भक्त याबरोबरच स्त्रीजाणिवेचा एक आद्य हुंकार, संतमांदियाळीतील संघटक, विद्रोही विचारवंत, कालजयी कवयित्री अशा विविध अंगांनी जनाबाईंच्या कर्तृत्वाचा आढावा या अंकात घेण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांच्या प्रभावाच्या पाऊलखुणा शोधणारे रिपोर्ताज आणि लेखही यात आहेत. सदानंद मोरे, अशोक कामत, तारा भवाळकर, फादर दिब्रिटो, प्रतिमा जोशी, इंद्रजित भालेराव, अरुणा ढेरे, रंगनाथ तिवारी, भास्कर हांडे, संजय सोनवणी, पराग पाटील, शिवाजीराव मोहिते, सुषमा देशपांडे अशा मान्यवरांनी जनाबाईंविषयीचं चिंतन या अंकात मांडले आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार भास्कर हांडे यांचे मुखपृष्ठ या अंकाला लाभले आहे, अशी माहिती 'रिंगण'चे संपादक सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड यांनी दिली.

भरगच्च दर्जेदार मजकूर आणि फोटोंनी सजलेल्या या १६८ पानी अंकाची किंमत केवळ ७० रुपये आहे. महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख विक्रेत्यांकडे हा अंक उपलब्ध असेलच. त्यासाठी सहित वितरणचे किशोर शिंदे यांना ९१७५२८६०७९ आणि ८९८३४१२६४० या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.