रत्नागिरी : जयगड येथील जिंदाल कंपनीकडून चक्क ग्रामस्थांची फसवणूक करण्यात आली आहे. पाणी देण्याबाबत करार करुनही पाणी देण्यास असमर्थता दाखविली आहे. कळझोंडी परिसरातील ३३ हजार ग्रामस्थांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.
कोकणात दरवर्षी धो धो पाऊस कोसळतो, उन्हाळ्यात मात्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. रत्नागिरी तालुक्यातल्या कळझोंडी आणि आसपासच्या २२ गावांमध्ये हीच स्थिती आहे. ग्रामस्थांना २ हंडे पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना याच परिसरात असलेल्या जिंदाल कंपनीला MIDC २४ तास पाणीपुरवठा करतेय.
कंपनी उभी राहताना टंचाईच्या काळात कंपनी ग्रामस्थांना पाणी पुरवेल, असा करार झाला होता. मात्र तो देखील विस्मरणात गेलाय. त्यामुळे ३५ वर्षांपूर्वी धरणासाठी पूनर्वसन झालेल्या ३३ हजार ग्रामस्थांवर तहानेनं तडफडण्याची वेळ आली आहे.
आता शिवसेनाही या मुद्द्यावर आक्रमक झालीये. ग्रामस्थांना पाणी मिळालं नाही, तर कंपनीची पाईपलाईन फोडून पाणी घेऊ असा इशारा आमदार उदय सामंत यांनी दिलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.