राज्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, तिघांचे बळी

पुणे, नाशिक, लातूर, भंडारामध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी झाली. यवतमाळ जिल्ह्यात शेतात वीज पडून ३ युवकांचा मृत्यू झालाय.  

Updated: May 11, 2016, 07:56 PM IST
राज्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, तिघांचे बळी title=

पुणे/ लातूर/ भंडारा : पुणे, नाशिक, लातूर, भंडारामध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी झाली. उकाड्याने हैराण नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळाला. वादळी वाऱ्यामुळे घरांची पडझड झाली. तर यवतमाळ जिल्ह्यात शेतात वीज पडून ३ युवकांचा मृत्यू झालाय.  

राज्याच्या विविध भागात पडत असलेला सध्याचा पाऊस हा पूर्व मान्सून पाऊस आहे. तसंच पुढील साधारणतः पाच दिवस हा पाऊस कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय़. सात ते १५ जून दरम्यान मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन होतं. मात्र २०मेनंतरच मान्सूनच्या आगमनाची अचूक माहिती वर्तवली जाऊ शकते, असं हवामान विभागाने म्हटलंय. 

पुण्यात पावसाची हजेरी

पुण्यातही आज पावसाने हजेरी लावली. वादळी वा-यासह शहराच्या अनेक भागात पाऊस झाला .सदाशिव पेठ, रुबी हॉलसमोर झाड कोसळल्याने काही वाहनांचं नुकसानही झालं. त्याचप्रमाणे अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ उडाली. 

पिंपरीकरांना पावसामुळे दिलासा

गेल्या काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या पिंपरीकरांना दुपारी सुरु झालेल्या पावसामुळे दिलासा मिळालाय. पिंपरी साधारण दुपारी अडीचच्या सुमारास वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली.

दरम्यान, जोरदार पावसामुळे पिंपरीत काही भागातील वीज गायब झाली. सध्या जवळपास सर्वच शाळांना सुट्या असल्यान बच्चे कंपनी पहिल्या पावसात मनसोक्त भिजत असल्याचं चित्र पाहण्यास मिळालं. अचानक आलेल्या या पावसानं कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. 

पालघरमध्ये वादळासह पाऊस

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुका आणि परिसरात मंगळवारी मोठ्या प्रमाणावर सोसाट्याच्या वादळी वा-यासह पाऊस पडला. तर काही भागात गारपीटही झाली. मोखाड्यातील गभालपाडा येथील घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. तर जव्हारमध्येही काल संध्याकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या..

भंडारा येथे पावसाने नागरिकांची तारांबळ

भंडारा जिल्ह्यात वादळी वा-यासह अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. जिल्ह्यातल्या सातही तालुक्यांना वादळवारा आणि पावसानं झोडपलं. यात ब-याच घरांचं नुकसान झालं. अचानकच्या या पावसानं भीषण गरमीत गारवा निर्माण केला. हा पाऊस भीषण गर्मीत गारवा देऊन गेला. तर आकाशात उमटलेल्या इंद्रधनुष्यानं सर्वांचं मन मोहून घेतलं. 

जोरदार पावसामुळे दुष्काळानं होरपळलेल्या जालना जिल्ह्यातल्या काही भागांनाही थंडावा मिळाला. दुपारच्या सुमाराला विजांसह पाऊस बरसला. यामुळे शहरातल्या मुख्य रस्त्यांवर पाणी साचलं. परिणामी काही काळ शहरातली वाहतूक विस्कळीत झाली होती. तर जिल्ह्यातल्या जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यांतल्या काही भागांमध्येही पावसाने हजेरी लावली. 

यवतमाळमध्ये ३ युवकांचा मृत्यू  

यवतमाळमध्ये पावसाचे तीन बळी गेलेत. नितीन बहादूरे, कृष्णा गायकवाड आणि मारोती हापसे अशी त्यांची नावं आहेत. उमरखेडच्या टाकळी शिवारात ही घटना घडलीये. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वारे आणि गारपिटीचा धुमाकूळ सुरू आहे. 

काल दुपारी शेत मशागतीची कामे सुरु असताना लाकडं गोळा करण्यासाठी हे तिघं गेले होते. त्याच वेळी अचानक आकाश भरून आलं आणि पाऊस सुरू झाला. तिघांनी एका झाडाखाली आश्रय घेतला. मात्र नेमकी या झाडावर वीज कोसळून यात तिघांचा अंत झाला.बराच वेळ होऊनही तिघं घरी परतले नसल्यामुळे घरच्यांनी शोध घेतल्यावर झाला प्रकार लक्षात आला.