पूजाने स्मशानभूमीत राहून मिळवले ९१ टक्के

शहरातल्या बार्शी रोड भागात असलेली स्मशानभूमी सध्या चर्चेत आहे. कारण आहे पूजा अणसरवाड. दहावीच्या या विद्यार्थिनीनं स्मशानभूमीत राहून ९१ टक्के गुण मिळवलेत. 

Updated: Jun 17, 2015, 01:37 PM IST
पूजाने स्मशानभूमीत राहून मिळवले ९१ टक्के title=

लक्ष्मीकांत रुईकर, बीड : शहरातल्या बार्शी रोड भागात असलेली स्मशानभूमी सध्या चर्चेत आहे. कारण आहे पूजा अणसरवाड. दहावीच्या या विद्यार्थिनीनं स्मशानभूमीत राहून ९१ टक्के गुण मिळवलेत. 

बीडच्या स्मशानभूमीत राहणारी पूजा. एकीकडे जळणारी प्रेतं आणि दुसरीकडे अभ्यास करत असलेली पूजा हे चित्र अनेकदा बीडकरांनी पाहिलंय. वडील भिक्षा मागतात तर आई सूया, बिब्बे, गर्सुल्या विकून कुटुंबाचा गाडा हाकते. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पूजा अणसारवाडनं मामाकडे म्हणजेच स्मशानभूमीत राहून दहावीच्या परीक्षेत ९१ टक्के गुण मिळवलेत. 

डॉक्टर होऊन लोकांचं आरोग्य चांगलं ठेवायचं हाच आपला हेतू असल्याचा पूजाचा निश्चय ऐकल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही. पूजानं मिळवलेल्या यशामुळे आमच्या कष्टाचं चीज झाल्याचं सांगताना तिच्या आई आणि मामाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात. 

ज्या ठिकाणी पोहोचल्यानंतर माणसाचा इहलोकीचा प्रवास थांबतो, त्या स्मशानभूमीच्या सानिध्यात पूजानं केवळ जिद्द आणि मेहनतीच्या बळावर मिळवलेलं यश नक्कीच कौतुकास्पदच आहे. पूजाला डॉक्टर व्हायचंय. त्यामुळे तिच्या पंखांना बळ देण्यासाठी गरज आहे ती समाजाच्या आधाराची.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.