धक्कादायक: पोलीसानंच केला पोलीस महिलेवर बलात्कार

पोलीस दलाला काळिमा फासणारी घटना रायगडमध्ये घडलीये. प्रशिक्षणार्थी महिला कर्मचाऱ्यावर प्रशिक्षण देणाऱ्या पोलिसानंच बलात्कार केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे गेल्या दीड दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. अत्याचार करणाऱ्याबरोबरच वरिष्ठांची भूमिकाही संशयास्पद आहे.

Updated: Jun 30, 2014, 11:56 AM IST
धक्कादायक: पोलीसानंच केला पोलीस महिलेवर बलात्कार title=
symbolic photo

अलिबाग: पोलीस दलाला काळिमा फासणारी घटना रायगडमध्ये घडलीये. प्रशिक्षणार्थी महिला कर्मचाऱ्यावर प्रशिक्षण देणाऱ्या पोलिसानंच बलात्कार केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे गेल्या दीड दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. अत्याचार करणाऱ्याबरोबरच वरिष्ठांची भूमिकाही संशयास्पद आहे.

भाषणांमध्ये महिला सुरक्षेची सातत्यानं हमी द्यायची, ही गृहमंत्र्यांची जुनी सवय... मात्र त्याच्या गृहखात्यातच महिला सुरक्षित नसल्याचं भीषण वास्तव रायगडमध्ये समोर आलंय. अलिबागमध्ये पोलीस प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणाऱ्या युवतीवर खाकी वर्दीतल्या एका नराधमानं बलात्कार केला. नागेश गावडे याचं लग्न झालेलं असतानाही त्यानं पीडित युवतीला लग्नाचं अमिष दाखवून गेल्या दीड-दोन वर्षांपासून शारिरीक संबंध ठेवले. संतापजनक बाब म्हणजे त्याची व्हिडिओ क्लिप तयार करून ती आपल्या मित्रांना पाठवली. झाला प्रकार लक्षात आल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी या तरुणीनं अलिबाग पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली. मात्र तिच्या या तक्रारीकडे वरिष्ठांनी साफ दुर्लक्ष केलं. त्यातही अश्विनी सानप या महिला अधिकारीच तेव्हा अप्पर पोलीस अधिक्षका होत्या. त्यांनीही तरुणीच्या तक्रारीला केराची टोपलीच दाखवली.

अखेर आता ६ महिन्यांनी अलिबाग पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीये. रजेवर असलेल्या नागेशला पोलिसांनी दौंडमध्ये अटक केली आहे.

आरोपी सध्या अलिबाग पोलिसांच्या ताब्यात असला, तरी महिन्यांपूर्वी तक्रार देवूनही पोलिसांनी काहीच कारवाई न केल्यानं गुन्ह्याचा तपास जिल्ह्याबाहेरच्या सक्षम यंत्रणेनं करावा अशी मागणी मनसेनं केलीये.

या घटनेमुळं पोलीस दलाची प्रतिमा नव्या कारणासाठी काळवंडली आहे. आणखी काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावं समोर येण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय. स्वतःची क्लीन इमेज असल्याचं सांगणारे जिल्हा पोलीस अधिक्षक अंकुश शिंदे यांनी या प्रकरणाकडे सहा महिन्यांपासून का दुर्लक्ष केलं, असा प्रश्नही उपस्थित होतोय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.