पुणे शहरातील मोरांवर समाजकंटकांची वाकडी नजर

संरक्षित जंगलामध्ये गेलं असता वन्यप्राणी आढळतीलच याची खात्री नाही. आणि शहरांमध्ये वन्यप्राणी दिसणं म्हणजे दुर्मीळ गोष्ट. पण पुण्यामध्ये भर शहरात अनेक मोर आनंदानं नांदत आहेत. मात्र, या मोरांवर देखील आता समाजकंटकांची वाकडी नजर पडली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत अनेक मोरांचा मृत्यू झाला आहे. 

Updated: Jul 3, 2015, 02:30 PM IST
पुणे शहरातील मोरांवर समाजकंटकांची वाकडी नजर title=

पुणे : संरक्षित जंगलामध्ये गेलं असता वन्यप्राणी आढळतीलच याची खात्री नाही. आणि शहरांमध्ये वन्यप्राणी दिसणं म्हणजे दुर्मीळ गोष्ट. पण पुण्यामध्ये भर शहरात अनेक मोर आनंदानं नांदत आहेत. मात्र, या मोरांवर देखील आता समाजकंटकांची वाकडी नजर पडली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत अनेक मोरांचा मृत्यू झाला आहे. 

 कोणालाही भुरळ घालतील अशी दृश्य. मुक्त संचार करणारे हे मोर कुठल्या अभयारण्यातील नाहीत. तर, हे मोर आहेत भर पुण्यात. पुण्यातल्या फातिमा नगरमध्ये ख्रिचन धर्मीयांची स्मशानभूमी आहे. आणि तिथंच हे जवळपास ८० हून अधिक मोर वास्तव्याला आहेत. इथं या मोरांचा अगदी मुक्त संचार असतो. विल्सन डिसोझा यांच्या सारखी माणसं तर वेळ आणि पैसे खर्च करून या मोरांना धान्य देतात. या कामात त्यांना इतरही प्राणी - पक्षीप्रेमींची मदत होते. त्यांची या मोरांना एवढी सवय झालीय की, विल्सन डिसोझा यांचा आवाज ऐकताच हे मोर पटापट जमा होतात. 

अनेक वर्षांपासून मोर इथं वास्तव्याला आहेत. विल्सन  डिसोझा आणि मोरांचा ऋणानुबंधच दहावर्षां हून  अधिक आहे. मात्र आता या मोरांवर कुणाची तरी वक्रदृष्टी पडलीय. मागील काही  दिवसात अनेक मोरांचा अचानक मृत्यू झालाय. त्या मागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, शिकारीची आणि मटणाची हौस भागवण्यासाठी या मोरांची हत्या झाल्याचा अंदाज आहे. त्याचे पुरावे या स्मशानभूमीत जागोजागी पाहायला मिळतात.

दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा तर खच पडलाय आणि हेच मोरांची संख्या अचानक घटण्याचं कारण आहे असा आरोप होतोय. जाणीवपूर्वक मोरांची हत्या करण्यात आली असेल तर ती गंभीर बाब आहे. नैसर्गिक कारणांमुळं मोरांचा मृत्यू झाला असेल तरी देखील त्याची दखल संबंधितांनी घ्यायला हवी. डिसूझा आणि अजय भोसले यांच्यासारखे लोक मोरांच्या या अचानक मृत्यूचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत. तसंच हे अचानक मृत्यू कसे रोखता येतील यासाठी देखील ते प्रयत्नशील आहेत.

आतापर्यंत कोणत्याही मदतीशिवाय आणि संरक्षणाशिवाय मोर इथं टिकून आहेत. आतापर्यंत माणसाचा इथं हस्तक्षेप झाला नाही आणि जो झाला तो मोरांच्या मदतीसाठी. हे त्यामागचं कारण आहे. आता हे मोर आपली हौस भागवण्यासाठी लक्ष केले जात असतील तर, त्यांना वाचवण्यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न होणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.