पुणे : मॅनेजमेंटच्या दुसऱ्या वर्षाच्या परीक्षेचा पेपर घरबसल्या लिहीणाऱ्या विद्यार्थिनीला आणि तिचा सोडवलेला पेपर उत्तर पत्रिकांच्या गठ्ठ्यात जमा करणाऱ्याला पोलिसांनी काल अटक केलीय.
निगडी येथील इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड करियर डेव्हलपमेंट या संस्थेमध्ये शिकणा-या विद्यार्थीनीने तिथल्याच शिपायाच्या मदतीने हा गैरप्रकार केला. अभ्यास न झाल्याने परीक्षेत कॉपी करण्याचा प्रकार काही नवा नाही. मात्र मॅनेजमेंट शिकणाऱ्या पुण्यातल्या विद्यार्थिनीने चक्क घरात बसून पेपर लिहीणं मॅनेज केलं.
ही तरूणी निगडी इथल्या इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करियर डेव्हलपमेंट या संस्थेत शिकते. सध्या सुरू असलेल्या परीक्षेला ती काही वेळापुरती बसायची. नंतर उत्तर पत्रिका तिच्या घरी पोहोचवली जायची. घरी बसून ती उत्तर पत्रिका पूर्ण करायची. आणि हीच उत्तर पत्रिका शिपायाकडून पुन्हा मूळ गठ्ठ्यात जमा व्हायची. या गैरप्रकाराची माहिती विद्यार्थी सेनेला मिळाली आणि त्यांनी पोलिसांच्या मदतीने हा प्रकार उघड केला.
या प्रकरणी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव प्रसाद कुलकर्णी यांन तक्रार दिल्यावर दोघांवर गुन्हे दाखल झाले. मात्र विद्यार्थिनीने घरी बसून उत्तर पत्रिका लिहील्याचं उघड झाल्यावरच तिच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांकडून जमा करण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांमधील या तरुणीची उत्तर पत्रिका थेट तिच्या घरी पोहोचतेच कशी हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.